पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता
- तब्बल दोन दशकांनी लागला निकाल- न्यायालयाचे तपासातील त्रुटींवर कडक ताशेरे मुंबई, 20 जून (हिं.स.) - काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित आणि बहुप्रलंबित निकाल अखेर लागला आहे. आज जाहीर करण्यात
पवनराजे निंबाळकर हत्याकांड


- तब्बल दोन दशकांनी लागला निकाल- न्यायालयाचे तपासातील त्रुटींवर कडक ताशेरे

मुंबई, 20 जून (हिं.स.) - काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित आणि बहुप्रलंबित निकाल अखेर लागला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी पद्मसिंह पाटील मागील सुनावणीप्रमाणे आजही रुग्णवाहिकेतून व्हिलचेअरवर न्यायालयात दाखल झाले होते. पवनराजेंचे सुपुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरही यावेळी उपस्थित होते. ओमराजेंनी ठाकरेंसोबत फारकत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर येणारा हा निकाल अधिकच लक्षवेधी ठरला आहे.

निकाल वाचन करताना न्यायमूर्ती म्हणाले की, २००२ पासून पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली. पवनराजेंनी २००३ मध्ये आपल्या जिवाला धोका असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आम्ही १२७ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे. साक्षीपुराव्यांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव येथील काही जणांचा समावेश आहे. जैन यांना १५ दिवस मारहाण करुन जबाब घेतला, त्याची औषधं बंद केली, हे अयोग्य आहे. ८ सप्टेंबरला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना २५ सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. पोलिसांच्या तपासात विसंगती आहेत. जर माफीचा साक्षीदार हा भरवशाचा नसेल तर पुढे याची गरज नाही. विश्वास ठेवण्याजोगा आहे का यासाठी तपास लागतो, पुरावा बघावा लागतो, अॅनलिसिस करावं लागतं. माफीच्या साक्षीदाराने दिलेलं पुरावे होते त्यांचा तपास झाला. इतरांनी दिलेल्या माहितीनुसार क्रॉस व्हेरिफाय केलं. सर्वसाधारण साक्षीदार आणि माफीचा साक्षीदार यांच्यात फरक आहे. सदैव आरोपीच्या सुरक्षेचे रक्षण केले पाहिजे. इतर आरोपीचे कबुली जबाब घेतले गेले, पण काळजी घेतली गेली नाही. प्रश्न न विचारता जबाब नोंदवले. अशी तरतूद कायद्यात नाही. त्यांचे जबाब आक्षेपार्ह ठरतात, संदिग्ध ठरतात, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती यांनी मांडले.

सरकार पक्ष आणि माफीच्या साक्षीदाराचा अर्ज सीबीआयकडे दिला. मात्र ते पत्र कुणी आणून दिलं हे कुणीच सांगितलं नाही. हे प्रकरण सहजतेने घेतलं. एसपींनी सांगितलं की मी फक्त्त शेरा दिला. त्यांनी फक्त्त ते पत्र हेडक्वार्टरला पाठवलं. ते पत्र ऑफिसला गेलं. मूळ पत्र आलं कुठून? पत्रातील हस्ताक्षर आणि सही योग्य, मात्र पत्रातील मजकूर पूरक नाही. साक्षीदार कधी खरं बोलतो कधी खोटं बोलतो. माफीच्या साक्षीदाराचा पहिला जबाब कायद्याला धरून नाही. सरकारी वकिलांनी सांगितलं पाहिजे होतं की तो जबाब महत्वाचा आहे, पण ते केलं नाही. त्यामुळे महत्वाचा पुरावा हुकला आणि संशय निर्माण झाला, असं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. माफीच्या साक्षीदाराची मोठी मालमत्ता आहे. अनेक फ्लॅट्स, भरपूर सोनं आहे. तो व्यावसायिक होता. त्याचा कोणताही उद्योग डबघाईला आला नव्हता. आर्थिकदृष्ट्या स्थिर होता. त्यामुळे 50 हजार रुपयांसाठी तो हे करेल असे दिसत नाही, असंही न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.

तपासातील सर्वात मोठ्या त्रुटीवर बोट ठेवताना न्यायालय म्हणाले, या खटल्याचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन (Mobile Phone) जप्त केलेला नाही. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) काढले गेले नाहीत. जप्ती पंचनाम्यात आरोपींच्या खिशात काय सापडले याची नोंद नाही. जर सीडीआर काढले असते, तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का, हे स्पष्ट झाले असते. घटनाक्रमात १२ कॉल रेकॉर्डचा उल्लेख आहे, ज्यातील एक फोन पीसीओ (PCO) वरून झाला होता. पवनराजेंना आरोपींचा थेट फोन आलाच नाही, तर मग पाठलागाची आणि संवादाची ही कथा ग्राह्य कशी धरायची?

पद्मसिंह पाटील यांनी राजकीय आणि व्यावसायिक वैमनस्यातून त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर दोन हल्लेखोरांना सुपारी देऊन ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या घडवून आणली, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ आरोपींविरोधात हा खटला चालला. अन्य आरोपींमध्ये लातूरचे व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त निरीक्षक मोहन शुक्ला तसेच गोळीबार करणाऱ्या दोन मारेकऱ्यांचा समावेश आहे. 2009 मध्ये सीबीआयकडून पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. मात्र सप्टेंबर 2009 पासून प्रकृतीच्या कारणास्तव ते जामिनावर बाहेर आहेत.

निकाल लेखन पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांची आवश्यकता असल्याचे सांगत मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी आज, २० जून रोजी पुढील सुनावणी ठेवली होती. त्यामुळे आज निकाल येणे अपेक्षितच होते. मुख्य शूटर असलेला पिंटू सिंह याला न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने निकालवाचनास विलंबाने सुरुवात झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande