अमेरिकेच्या दबावानंतरही भारताची रशियन तेल आयात विक्रमी पातळीवर
नवी दिल्ली , 21 जून (हिं.स.)।अमेरिकेकडून रशियन तेल खरेदीवर कठोर भूमिका घेतली जात असताना आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यांनंतरही भारताने जून महिन्यात रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत विक्रमी पातळी कायम ठेवली आहे. इत
अमेरिकेच्या दबावानंतरही भारताची रशियन तेल आयात विक्रमी पातळीवर


नवी दिल्ली , 21 जून (हिं.स.)।अमेरिकेकडून रशियन तेल खरेदीवर कठोर भूमिका घेतली जात असताना आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यांनंतरही भारताने जून महिन्यात रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत विक्रमी पातळी कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे, तर संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडूनही तेल खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.

विश्लेषकांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्यापूर्वी आणि आखाती देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यापूर्वी भारतीय रिफायनरी कंपन्यांनी पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी आयात वाढवली आहे. समुद्री आणि वस्तूविषयक माहिती देणाऱ्या ‘केप्लर’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, १९ जूनपर्यंत भारताने रशियाकडून सरासरी २६.६ लाख बॅरल प्रतिदिन (बीपीडी) कच्च्या तेलाची आयात केली असून, मे महिन्यात हा आकडा १९.१ लाख बीपीडी होता. त्यामुळे रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार म्हणून कायम आहे.

जून महिन्यात यूएईकडून भारताने ६.३६ लाख बीपीडी कच्च्या तेलाची आयात केली, जी मे महिन्यातील विक्रमी ६.४४ लाख बीपीडीच्या जवळपास आहे. तर, २.०९ लाख बीपीडी पुरवठ्यासह व्हेनेझुएला हा भारताचा चौथा सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. सौदी अरेबियाकडून ३.८४ लाख बॅरल प्रतिदिन इतकी आयात झाली.

याउलट, अमेरिकेकडून होणारी तेल आयात घटून केवळ ९१ हजार बीपीडीवर आली आहे. मे महिन्यात हा आकडा २.५२ लाख बीपीडी होता. भारताच्या खरेदी धोरणामध्ये विविधीकरणाची रणनीती स्पष्टपणे दिसून येत आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणारे कच्चे तेल अद्याप आकर्षक ठरत असून, होर्मुझ सामुद्रधुनीतील अनिश्चिततेच्या काळात यूएईकडून वाढलेली खरेदी पुरवठा सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरली आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा आयातदार देश आहे. कच्चे तेल, द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) यांसाठी भारत मोठ्या प्रमाणात आखाती देशांवर अवलंबून आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला होता. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतुकीसाठी हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविराम करारानंतर गेल्या आठवड्यापासून तेलवाहू टँकरची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. तरीही हा युद्धविराम किती काळ टिकेल, याबाबत चिंता कायम आहे.

‘केप्लर’चे वरिष्ठ व्यवस्थापक (मॉडेलिंग) सुमित रितोलिया यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे भारताला सर्वप्रथम एलपीजी पुरवठ्यात मोठा दिलासा मिळेल. मात्र, कच्चे तेल आणि एलएनजीचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी काहीसा अधिक कालावधी लागू शकतो.त्यांनी सांगितले की, भारताने आधीच पर्यायी स्रोत आणि पुरवठा मार्गांचा वापर करून अनेक महिन्यांच्या संभाव्य अडचणींशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे सर्वप्रथम एलपीजी, त्यानंतर एलएनजी आणि शेवटी कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्ण क्षमतेने पूर्ववत होईल.

सुमित रितोलिया यांच्या मते, जून महिन्यात भारताची रशियाकडून होणारी तेल आयात २३.५ लाख बीपीडीपेक्षा अधिक राहण्याची आणि नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक सवलतीचे दर आणि स्थिर मागणी यामुळे भविष्यातही रशियन तेल भारताच्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावत राहील. मार्च महिन्यापासून भारतीय रिफायनरी कंपन्यांनी आखाती प्रदेशातून कमी झालेल्या पुरवठ्याची भरपाई करण्यासाठी अटलांटिक क्षेत्र आणि व्हेनेझुएलाकडूनही खरेदी वाढवली आहे. जून महिन्यात व्हेनेझुएलाकडून दररोज तीन ते चार लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande