

भोपाळ, 21 जून (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरने योगाबाबतची जागरूकता आणि बांधिलकी यांचे अनोखे दर्शन घडविले. मध्य प्रदेशातील या शहरातील गोपुर चौकात आयोजित भव्य सामूहिक योग कार्यक्रमात हजारो योगसाधक सहभागी झाले आणि निरोगी जीवनाचा संदेश घराघरांत पोहोचविला. यासोबतच एकाच वेळी भ्रामरी प्राणायाम करून येथे एक अनोखा विश्वविक्रमही प्रस्थापित करण्यात आला.
इंदूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘योगमित्र’ अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात नगरीय प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय, मंत्री दुर्गादास उइके, महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर नागरिक सहभागी झाले होते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘निरोगी आयुष्यासाठी योग’ अशी ठेवण्यात आली होती. त्यानुसार योगाला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाची मुख्य सुरुवात सकाळी सहा वाजता झाली. प्रारंभी शहरातील विविध संस्थांनी योगासने आणि सांस्कृतिक सादरीकरणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर निर्धारित कॉमन योग प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला. योग प्रशिक्षक राकेश चौधरी तसेच इंदूरची कन्या आणि ‘मिसेस इंडिया-२०२३’ चेतना जोशी यांनी योग सत्राचे संचालन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला.
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १० हजारांहून अधिक योगसाधकांनी एकाच वेळी केलेला सामूहिक भ्रामरी प्राणायाम होय. सहभागी नागरिकांनी सलग तीन मिनिटांहून अधिक काळ भ्रामरी प्राणायाम करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आयोजकांच्या मते, हा प्रयत्न विश्वविक्रमाच्या नोंदीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान योगसाधकांचा शिस्तबद्ध सहभाग आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.
या भव्य कार्यक्रमात इंदूरमधील ७० हून अधिक योग संस्था, विविध क्रीडा संघटना, १५० पेक्षा अधिक सामाजिक संस्था तसेच समाजातील विविध घटकांतील हजारो नागरिक सहभागी झाले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांची उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली. यामुळे योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून निरोगी आणि संतुलित जीवनासाठी आवश्यक घटक बनत असल्याचा संदेश देण्यात आला.
योग दिनानिमित्त योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ योगगुरू, योगपटू आणि योग प्रचारकांचा ‘योग अलंकरण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे अनेक वर्षे योगाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली. तसेच कार्यक्रमादरम्यान ‘योगमित्र’ अभियानाच्या नव्या अधिकृत संकेतस्थळाचेही लोकार्पण करण्यात आले. या डिजिटल व्यासपीठाद्वारे शहरातील सर्व योगमित्र योगशाळा, योग प्रशिक्षण केंद्रे आणि विविध योगविषयक उपक्रमांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना योगाशी जोडले जाणे आणि नियमित सराव करणे अधिक सोयीचे होणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी नियमित योगाभ्यास करून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा संकल्प केला. वक्त्यांनी सांगितले की, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणारा ताणतणाव, मानसिक दबाव आणि विविध शारीरिक समस्यांपासून बचाव करण्यासाठी योग हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. योग केवळ शरीर निरोगी ठेवत नाही, तर मानसिक शांतता आणि आत्मिक संतुलनही प्रदान करतो. अशा प्रकारे इंदूरने पुन्हा एकदा निरोगी समाजाच्या निर्मितीत योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश दिला.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण मध्य प्रदेशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जबलपूर येथील गॅरिसन ग्राउंडवर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात द्रौपदी मुर्मू, डॉ. मोहन यादव तसेच मंगुभाई पटेल यांनी योगाभ्यास केला. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule