
* महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन
नवी दिल्ली, 21 जून (हिं.स.)
: योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा व्यायाम नसून मन, शरीर आणि आत्म्याला ब्रह्मांडाच्या नैसर्गिक लयीशी जोडणारी जीवनपद्धती आहे. योग म्हणजे आपल्या अस्तित्वाला विश्वाशी जोडणारे प्रभावी माध्यम असून तो निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा आधार आहे, असे प्रतिपादन निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी केले.
नवीन महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र सदन, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमास दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलापत्ते, उपनिवास अभियंता जमुनाप्रसाद गंगवार तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिजित गोडबोले, विवेक गर्गे, अभिजित पाठक आणि नितीन सरदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची निरोगी वार्धक्यासाठी योग ही जागतिक संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विशेष योगाभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या वयातही शारीरिक सुदृढता, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनशैली जपण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी