
पुणे, 21 जून (हिं.स.)। भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी अवघ्या १६ दिवसांत पूर्ण झाली असून, या खटल्याचा निकाल येत्या गुरुवारी (२५ जून) जाहीर करण्यात येणार आहे. विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली होती. सरकार पक्षाने १६ दिवसांच्या कालावधीत ५५ साक्षीदारांच्या साक्षी आणि इतर पुरावे न्यायालयासमोर सादर केले. शुक्रवारी (१९ जून) आरोपीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (२० जून) विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात सरकार पक्ष आणि बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि सहायक वकील प्रथमेश हिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा संदर्भ देत बाजू मांडली. युक्तिवादादरम्यान सरकार पक्षाने आरोपीने वासनेपोटी अत्यंत क्रूरपणे बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला. तसेच, या गुन्ह्यात आरोपीने अमानुषतेची आणि क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे न्यायालयासमोर नमूद करण्यात आले. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येत्या २५ जून रोजी न्यायालयाचा अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु