

भोपाळ, 21 जून (हिं.स.)। १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी जबलपूरच्या गॅरिसन ग्राउंडवर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी योगाभ्यास केला. या वेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि राज्यपाल मंगुभाई पटेल यांनीही विविध योगमुद्रा आणि प्राणायामाचा सराव केला.
मध्य प्रदेशात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आणि त्यांनी विविध योगासनांचा अभ्यास केला. जबलपूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मुख्य उपस्थितीत १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस-२०२६ निमित्त 'सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम' पार पडला.
'स्वस्थ आयुष्यासाठी योग' या थीमवर आयोजित सामूहिक योगाभ्यासात सुमारे ५००० नागरिक आणि ३१ शाळांमधील सुमारे ३४०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध योगासन केली. कार्यक्रमाला राज्यपाल पटेल, मुख्यमंत्री डॉ. यादव, उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, लोकनिर्माण मंत्री राकेश सिंह आणि आयुष मंत्री इंदर सिंह परमार यांनीही उपस्थित राहून योगाभ्यास केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदूरने भ्रामरी प्राणायामात नवा विक्रम नोंदवला. शहरात आयोजित सामूहिक योग कार्यक्रमादरम्यान हजारो सहभागी नागरिकांनी सलग ३ मिनिटांहून अधिक काळ भ्रामरी प्राणायाम केला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लोकांनी एकत्रितपणे प्राणायाम करून योगाबाबत जनजागृती आणि आरोग्याबाबतची बांधिलकी व्यक्त केली. आयोजकांनी याला सामूहिक सहभाग आणि योगाच्या वाढत्या जनआंदोलनाचे प्रतीक असे सांगितले.
दरम्यान, राजधानी भोपाळमधील टीटी नगर स्टेडियममध्येही मोठ्या संख्येने नागरिकांनी योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला. कार्यक्रमासाठी प्रशासनाने सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत व्यवस्थांची विशेष तयारी केली होती.
ग्वाल्हेरमध्येही १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रभारी मंत्री तुलसी सिलावट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. शहरातील शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन विविध योगमुद्रा आणि प्राणायामाचा अभ्यास केला. सहभागी नागरिकांनी नियमित योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून शरीर आणि मन निरोगी ठेवण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून योगाबाबत जनजागृती वाढविण्याचा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला.
१२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी उज्जैनच्या दशहरा मैदानावर सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रभारी मंत्री गौतम टेटवाल, विकास प्राधिकरण अध्यक्ष रवी सोलंकी, नगर निगम सभापती कलावती यादव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही या योगाभ्यासात सहभाग घेतला.
'स्वस्थ आयुष्यासाठी योग' या थीमवर आयोजित या कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी योगासन आणि प्राणायाम केले. या वेळी उपस्थितांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे संबोधन थेट प्रक्षेपणाद्वारे ऐकले. नियमित योगाचा अवलंब करून निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
विश्व पर्यटनस्थळ सांची येथील स्तूप परिसरातही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांनीही उपस्थिती लावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule