
'ट्राय-कमिशनिंग'मुळे भारताच्या युद्धनौका निर्मिती क्षमतेला चालना मिळेल - नौदल प्रमुख
नवी दिल्ली, 21 जून (हिं.स.)। भारताच्या नौदल ताफ्यात रविवारी एकाच वेळी तीन जहाजांचा समावेश होणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे भारतीय नौदलाची समुद्रातील ताकद अधिक वाढली आहे. यापैकी एक जहाज खोल समुद्र आणि किनारी भागांतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी विशेषतः तयार करण्यात आले असून, त्यामुळे शोध व बचाव मोहिमा अधिक वेगाने राबवता येणार आहेत. घातक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि रडारपासून बचाव करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या आयएनएस दुनागिरीच्या समावेशामुळे नौदलाची युद्धक्षमता वाढणार आहे. तसेच नौदलात दाखल करण्यात आलेले आयएनएस अग्रय हे पाणबुडीविरोधी युद्धनौक असून, त्यामुळे समुद्रातच शत्रूच्या पाणबुड्यांचा नाश करण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तीन अत्याधुनिक स्वदेशी जहाजे आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक राष्ट्राला समर्पित केली. या तिन्ही जहाजांचा औपचारिकरित्या नौदलात समावेश होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक मानले जात आहे. तिन्ही जहाजांची निर्मिती भारतात स्वदेशी साहित्याचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या सागरी देखरेख, सुरक्षा आणि संशोधन क्षमतांना मोठी बळकटी मिळणार आहे.
आयएनएस संशोधक हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक स्वदेशी सर्वेक्षण जहाज आहे. ते ‘संधायक’ श्रेणीतील सर्वेक्षण जहाजांचे चौथे आणि अंतिम जहाज असून, खोल समुद्र तसेच किनारी भागांतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे. या जहाजाची निर्मिती कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे करण्यात आली असून, त्यात ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज डिजिटल साइड-स्कॅन सोनार आणि स्वायत्त पाण्याखालील वाहनांसह अत्याधुनिक सर्वेक्षण उपकरणांनी सुसज्ज आहे. या जहाजाचे वजन सुमारे ३,४०० टन आहे. सर्वेक्षणाबरोबरच हे जहाज आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचाव मोहिमांमध्ये मदत करण्यास तसेच नौदलासाठी महत्त्वपूर्ण सागरी व किनारी माहिती संकलित करण्यास सक्षम आहे. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या सागरी देखरेख, सुरक्षा आणि संशोधन क्षमतांना मोठी मजबुती मिळणार आहे.
आयएनएस दुनागिरी हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १७ए (नीलगिरी श्रेणी) अंतर्गत तयार करण्यात आलेले पाचवे स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौक आहे. हे जहाज घातक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि रडारपासून बचाव करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याची रचना आणि निर्मिती गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड यांनी केली आहे. या जहाजाच्या निर्मितीत सुमारे ७५ टक्के स्वदेशी उपकरणे आणि साहित्य वापरण्यात आले आहे. उत्तराखंडमधील हिमालयातील दुनागिरी शिखराच्या नावावरून या जहाजाला नाव देण्यात आले आहे. हे जहाज मूळ आयएनएस दुनागिरीचे पुनरागमन मानले जाते. मूळ जहाजाने १९७७ ते २०१० या कालावधीत ३३ वर्षे नौदलात सेवा बजावली होती. हे युद्धनौक हवाई, सागरी आणि पाण्याखालील कोणत्याही धोक्याचा मुकाबला करण्यास सक्षम आहे. तसेच ते मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभाग-ते-हवा क्षेपणास्त्रांबरोबरच पाणबुडीविरोधी रॉकेट प्रणालीनेही सज्ज आहे.
आयएनएस अग्रय हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौक आहे. याची निर्मितीही गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्य वापरून करण्यात आली आहे. हे जहाज उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश करण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे. सुमारे ७७ मीटर लांबीचे हे जहाज वॉटरजेट प्रणालीद्वारे चालते, ज्यामुळे किनारी भागांत त्याला उत्कृष्ट वेग आणि गतिशीलता प्राप्त होते. हे जहाज अत्याधुनिक हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि उथळ पाण्यात कार्य करणाऱ्या सोनार प्रणालीने सज्ज आहे. या जहाजाच्या संचालनासाठी सुमारे ५७ कर्मचाऱ्यांचा (७ अधिकारी आणि ५० नौसैनिक) ताफा आवश्यक असतो. १९९१ मध्ये सेवेत दाखल झालेल्या आणि २०१७ मध्ये निवृत्त झालेल्या अभय श्रेणीतील गस्ती जहाजाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी या युद्धनौकेला ‘अग्रय’ हे नाव देण्यात आले आहे.
यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन म्हणाले, “आज एकाच वेळी तीन जहाजे नौदलात दाखल करण्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मी संपूर्ण समर्पित पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि एमएसएमई यांचेही आभार मानतो, ज्यांच्या सहकार्यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. नौदल मुख्यालय, कमांड मुख्यालय, युद्धनौका पथके आणि चाचणी संस्था यांचेही सुरुवातीपासूनच्या कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी अभिनंदन केले पाहिजे. गेल्या वर्षी मुंबईत स्वतंत्र भारतातील पहिल्या ‘ट्राय-कमिशनिंग’नंतर अवघ्या १७ महिन्यांनी आज कोलकात्यात होत असलेले हे दुसरे ‘ट्राय-कमिशनिंग’ भारताच्या युद्धनौका निर्मिती क्षमतेत आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाला नवी गती देणारे ठरेल. या तिन्ही प्रकल्पांनी अनेक नवे मैलाचे दगडही स्थापित केले आहेत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule