

दिसपूर, 21 जून (हिं.स.)। पूर्व भारतातील सर्वांत मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जाणारा अंबुबाची उत्सव यंदा २२ जून २०२६ पासून गुवाहाटीतील ऐतिहासिक नीलाचल पर्वतावरील माँ कामाख्या मंदिरात सुरू होणार असून २६ जून रोजी ‘निवृत्ती’नंतर त्याची सांगता होईल. देवी कामाख्येच्या वार्षिक रजस्वला चक्राशी आणि स्त्रीशक्तीच्या प्रतीकाशी जोडलेला हा चार दिवसीय उत्सव देशासह विदेशातील भाविक, साधुसंत आणि तांत्रिक साधकांसाठी मोठ्या आस्थेचे केंद्र मानला जातो. यंदा या मेळ्यात आठ लाखांहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने आसाम सरकार आणि मंदिर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
आसामच्या पर्यटन मंत्री अजंता नियोग यांनी सांगितले की, हा देशातील सर्वांत मोठा धार्मिक अंबुबाची उत्सव आहे आणि भारतासह विविध देशांतून लाखो भाविक येथे येतात. भाविकांना पिण्याचे पाणी, अन्न, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निम्न भागांमध्ये निवासासाठी तंबू आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या गर्दीचे नियोजन हीच सर्वांत मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी भाविकांना सकाळी पाच ते संध्याकाळी सहा या वेळेतच कामाख्या मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले.
उत्सवाच्या सुरळीत आयोजनासाठी आसाम सरकारने गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्यसेवा, सुरक्षा, वाहतूक आणि निवासव्यवस्था या बाबींसाठी चोवीस विभागांमध्ये चार कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर केले आहेत. मंदिर प्रशासनाने विशेष दर्शनासाठी असलेले सर्व ऑफलाइन काउंटर बंद केले असून विशेष दर्शनाची इच्छा असणाऱ्या भाविकांना आता ऑनलाईन पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सर्वसामान्य दर्शन पूर्णपणे विनामूल्य राहणार आहे.
अंबुबाची उत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या कालावधीत देवी कामाख्येला विश्रांती दिली जाते, अशी श्रद्धा असल्यामुळे मंदिराचे मुख्य दरवाजे तीन दिवस बंद ठेवले जातात. या काळात मंदिरात कोणतीही पूजा, आरती किंवा अन्य धार्मिक विधी होत नाहीत. चौथ्या दिवशी शुद्धीकरणाचे विशेष विधी पूर्ण केल्यानंतर मंदिराचे दरवाजे पुन्हा भाविकांसाठी उघडले जातात. त्यामुळे अंबुबाची उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, परंपरा, स्त्रीशक्ती आणि सांस्कृतिक वैभव यांचा विलक्षण संगम मानला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule