तामिळनाडूत अमोनिया गॅस गळती; ७ कामगारांचा मृत्यू
चेन्नई, 21 जून (हिं.स.)। तिरुवल्लूर जिल्ह्यातील (तामिळनाडू) पेरियापालयमजवळील कनिगईपायर गावात असलेल्या सेंट पीटर्स अँड पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स या समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योगात अमोनिया वायूची गळती होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगारांच
tamil nadu ammonia gas leak seafood export unit


चेन्नई, 21 जून (हिं.स.)। तिरुवल्लूर जिल्ह्यातील (तामिळनाडू) पेरियापालयमजवळील कनिगईपायर गावात असलेल्या सेंट पीटर्स अँड पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स या समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योगात अमोनिया वायूची गळती होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला असून ६७ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सात जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रावर ठेवण्यात आले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कारखान्यामध्ये कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे काम केले जात असे. या दुर्घटनेनंतर कामगारांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या समितीला २४ तासांत अंतरिम अहवाल आणि पुढील ३ दिवसांत अंतिम अहवाल सोपवण्याची सूचना देण्यात आली आहे.

तिरुवल्लूर जिल्हाधिकारी एस. कविता यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायूगळतीमुळे बाधित झालेल्या सर्व कामगारांना तातडीने जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये हलविण्यात आले. त्यापैकी ४६ जणांवर वेल्स रुग्णालयात, तर २१ जणांवर वेंकटेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर प्रशासन, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

या उद्योगातील बहुतांश कामगार उत्तर भारतातील विविध राज्यांमधून रोजगारासाठी येथे आलेले असल्याचे सांगितले जात आहे. अमोनिया वायूचा संपर्क आल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही कामगारांना चक्कर येणे, मळमळणे आणि उलट्यांसारखी लक्षणे दिसून आली. त्यानंतर सर्व बाधितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेनंतरच्या छायाचित्रांमध्ये कामगारांना रुग्णवाहिकांमधून उद्योग परिसरातून बाहेर काढून उपचारासाठी नेले जात असल्याचे दिसून आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या शवविच्छेदनाबाबत विचारविनिमय सुरू आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. लोकभवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, पेरियापालयमजवळील कनिगईपायर गावातील कोळंबी प्रक्रिया उद्योगात झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या दुर्घटनेमुळे अनेक निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे.

राज्यपालांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त करताना या कठीण काळात त्यांना धैर्य लाभावे अशी प्रार्थना केली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व जखमी कामगारांच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande