दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सीसीपीएची कारवाई
नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनांवरील खोट्या दाव्यांविरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कठोर भूमिका घेत दोन नामांकित कंपन्यांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच संबंधित कंपन्यांन
CCPA Takes Action Against Misleading Advertisements


नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.)। ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनांवरील खोट्या दाव्यांविरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कठोर भूमिका घेत दोन नामांकित कंपन्यांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच संबंधित कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनांवर, संकेतस्थळांवर आणि समाजमाध्यमांवरील प्रचारातून दिशाभूल करणारे दावे तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणातील एका कंपनीने आपल्या नारळपाण्याची विक्री शंभर टक्के नैसर्गिक कोवळ्या नारळाचे पाणी असा दावा करून केली होती. मात्र तपासात या उत्पादनात केवळ नारळपाणी नसून इतर घटकांचाही समावेश असल्याचे आढळून आले. दुसऱ्या कंपनीने आपल्या ब्रेडची जाहिरात “शंभर टक्के गव्हाच्या पिठाची ब्रेड” अशी केली होती. परंतु तपासात या ब्रेडमध्ये केवळ ८७ टक्के गव्हाचे पीठ असल्याचे उघड झाले, तर उर्वरित भागात इतर घटकांचा समावेश होता.

या प्रकरणाची सुनावणी करताना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्ट केले की “शंभर टक्के” हा शब्द केवळ जाहिरातीसाठी वापरण्याचा आकर्षक घोषवाक्य नसून तो अचूक आणि गणितीयदृष्ट्या निश्चित दावा आहे. एखादे उत्पादन शंभर टक्के शुद्ध, नैसर्गिक किंवा एखाद्या विशिष्ट घटकापासून बनलेले असल्याचा दावा केला जात असेल, तर त्यामध्ये इतर कोणत्याही पदार्थाचा अगदी अल्प प्रमाणातही समावेश असता कामा नये.

प्राधिकरणाने नमूद केले की पाणी, संरक्षक रसायने, मिश्रणे किंवा इतर घटकांचा समावेश असताना “शंभर टक्के” असा दावा करणे ही ग्राहकांची फसवणूक असून तो भ्रामक जाहिरातींच्या श्रेणीत मोडतो. अशा प्रकारच्या दाव्यांमुळे ग्राहक चुकीचे निर्णय घेतात आणि उत्पादनाच्या वास्तविक गुणवत्तेबाबत भ्रम निर्माण होतो. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande