
जळगाव, 23 जून, (हिं.स.) रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना-मधुबनी आणि उधना-झंझारपूर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्या भुसावळ आणि जळगाव मार्गे धावत असल्याने परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा कालावधी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे उधना-मधुबनी विशेष (09045) ही गाडी यापूर्वी 14 जूनपर्यंत चालविण्यात येणार होती. आता तिची मुदत वाढवून 5 जुलै 2026 पर्यंत करण्यात आली आहे. तसेच मधुबनी-उधना विशेष (09046) ही परतीची गाडी 15 जूनऐवजी आता 6 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे.
उधना-झंझारपूर विशेष (09047) या गाडीच्या संचालन कालावधीतही वाढ करण्यात आली असून ती आता 5 जुलै 2026 पर्यंत धावेल. तर झंझारपूर-उधना विशेष (09048) ही परतीची गाडी 6 जुलै 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी अधिकृत रेल्वे ॲप आणि आरक्षण केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गाड्यांचे थांबे, वेळापत्रक आणि इतर माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात गर्दीच्या हंगामात अतिरिक्त गाड्या चालविण्याची मागणीही प्रवाशांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर