ब्रिक्स अध्यक्षपदासाठी चीनचा भारताला पाठिंबा
नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.)। चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या १६व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भारतासोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
ब्रिक्स अध्यक्षपदासाठी चीनचा भारताला पाठिंबा


नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.)। चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या १६व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भारतासोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला.

वांग यी म्हणाले की, चीन आणि भारत हे शेजारी देश असून ‘ग्लोबल साउथ’ मधील दोन प्रमुख अर्थव्यवस्था आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अधिक सखोल सहकार्य असणे आवश्यक आहे. भारत २२ आणि २३ जून २०२६ रोजी ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीचे यजमानपद भूषवत असून, या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भूषवले आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख ‘आजच्या जगासमोरील अपारंपरिक सुरक्षा आव्हाने’ या विषयावर चर्चा करत आहेत.

भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर वांग यी यांचे वक्तव्य पोस्ट केले. त्यानुसार, वांग यी म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून चीन आणि भारताने केवळ दीर्घकालीन दृष्टीकोनातूनच नव्हे, तर जागतिक दृष्टिकोनातूनही द्विपक्षीय संबंधांकडे पाहिले पाहिजे आणि परस्पर सहकार्य वाढवले पाहिजे.

सीमा प्रश्नाबाबत बोलताना वांग यी यांनी मतभेद संयमाने आणि काळजीपूर्वक हाताळण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “एकमेकांच्या मूलभूत हितसंबंधांचा आदर करणे, संवेदनशील मुद्दे योग्य पद्धतीने हाताळणे आणि चीन-भारत सीमा प्रश्नाला योग्य स्थान देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा द्विपक्षीय संबंधांच्या एकूण स्वरूपावर परिणाम होणार नाही.”वांग यी यांनी पुढे सांगितले की, ब्रिक्सचे फिरते अध्यक्षपद भूषवणाऱ्या भारताच्या जबाबदाऱ्यांना चीनचा पूर्ण पाठिंबा आहे आणि भारतासोबत सहकार्य करत पुढे जाण्यास चीन तयार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande