राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मुंबई, 23 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून २४ ते २७ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक अंतर्गत भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळ
rainfall


मुंबई, 23 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून २४ ते २७ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक अंतर्गत भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला असून शहराच्या बहुतांश भागांत संततधार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान केंद्राकडून होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस शहरात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून जुलैच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईतील सायन परिसरात सकाळच्या गर्दीच्या वेळी एक बेस्ट बस रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि मोठी कोंडी निर्माण झाली. दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला आहे.

रायगड जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून माणगाव, म्हसळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यांत हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यासाठी हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भात रोपवाटिका करपण्याच्या मार्गावर होत्या आणि अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. मात्र नव्याने सुरू झालेल्या पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कालपासून पाऊस सक्रिय झाला असून गेल्या चोवीस तासांत सरासरी ८०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक १२६ मिलिमीटर पाऊस पडला. पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्ह्यासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande