मराठी भाषेची अवहेलना; राज ठाकरेंकडून राहुल नार्वेकरांवर टीकेची झोड
मुंबई, 23 जून (हिं.स.)। पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशा भोसले यां
Raj Thackeray


मुंबई, 23 जून (हिं.स.)। पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशा भोसले यांच्यावरील शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकर यांनी मराठी भाषेची अक्षरशः चिरफाड केली असून, त्यांना समोर लिहून दिलेले मराठीदेखील व्यवस्थित वाचता आले नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले की, नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मराठीऐवजी स्वाहिली किंवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी कदाचित काही फरक पडला नसता, कारण त्यांनी केलेले मराठी वाचनही कोणालाच समजले नाही. यावेळी त्यांनी दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख चुकून दीनदयाळ मंगेशकर असा केल्याचा आरोप करत हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे, सभागृहात उपस्थित असलेल्या एकाही आमदाराने या गंभीर चुकीवर आक्षेप घेतला नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधत भाजपच्या खोगीरभरतीच्या राजकारणामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते की नाही याची माहिती नसल्याचे सांगत, ते उपस्थित असले तरी या प्रकाराचे गांभीर्य त्यांनी घेतले नसते, असा टोला त्यांनी लगावला. शोकप्रस्ताव हा केवळ औपचारिकता नसून तो महान व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली असते, याचे भान सत्ताधाऱ्यांना राहिलेले दिसत नाही, असे त्यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत मराठी भाषेच्या अभ्यासाशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी गणेश वासुदेव मावळणकर, दत्तात्रय काशिनाथ कुंटे, बाळासाहेब भारदे, अरुण गुजराथी आणि दिलीप वळसे पाटील यांसारखे अभ्यासू व सक्षम व्यक्ती लाभल्याची आठवण करून देत सध्याच्या परिस्थितीची त्यांनी खंत व्यक्त केली.

मराठी भाषेची गळचेपी केवळ केंद्राच्या हिंदी धोरणातून किंवा परप्रांतीयांच्या वाढत्या प्रभावातूनच नव्हे, तर राज्याच्या विधिमंडळातूनही होत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आशा भोसले यांच्या निधनावरील शोकप्रस्ताव नव्हे, तर मराठी भाषेच्याच निधनाचा शोकप्रस्ताव काल विधानसभेत मांडला गेला, अशी बोचरी टीका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राहुल नार्वेकर यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande