
नवी दिल्ली , 23 जून (हिं.स.)।स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या पहिल्या फेरीतील चर्चेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाली असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे इराणला तेल विक्रीसाठी देण्यात आलेली ६० दिवसांची सवलत. जागतिक ऊर्जा बाजारासह भारताच्या दृष्टीनेही हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी भारत मोठ्या प्रमाणावर इराणकडून कच्चे तेल आयात करत होता. मात्र, निर्बंधांनंतर त्यात मोठी घट झाली होती. आता इराणला तेल निर्यातीसाठी दिलेल्या तात्पुरत्या सूटमुळे भारतालाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ६० दिवसांच्या सामंजस्य करारानुसार (एमओयू) तेहरानला ही सवलत देण्यात आली आहे. त्याबदल्यात इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीत कोणताही अडथळा आणणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. या करारानुसार २१ ऑगस्टपर्यंत इराणला कच्चे तेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची विक्री करण्याची मुभा असेल. स्वित्झर्लंडमधील चर्चेत “लक्षणीय प्रगती” झाल्याचे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सांगितल्यानंतर काही तासांतच हा निर्णय जाहीर करण्यात आला.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ‘इराण जनरल लायसन्स एक्स’ जारी केले असून, त्याअंतर्गत २१ ऑगस्टपर्यंत इराणमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या, पेट्रोकेमिकल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या उत्पादन, पुरवठा आणि विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. याआधी निर्बंधांच्या कक्षेत येणारे अशा व्यवहारांशी संबंधित आवश्यक आर्थिक व्यवहारही या कालावधीत वैध राहणार आहेत.
भारत आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे इराणला मिळालेली ही सवलत भारतासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला होता आणि त्याचा फटका भारतालाही बसला होता. आता अमेरिकेने इराणला दिलेल्या ६० दिवसांच्या सूटमुळे भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने इराणवर निर्बंध लागू करण्यापूर्वी भारत हा इराणच्या तेलाचा प्रमुख ग्राहक होता. २०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लागू केले आणि त्यानंतर भारताने इराणकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली. त्यानंतर युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत हा रशियन कच्च्या तेलाचा प्रमुख खरेदीदार म्हणून उदयास आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode