कोलकात्यात बांधकामाधीन तीन मजली गोदाम कोसळून अपघात; पाच जणांचा मृत्यू,बचावकार्य सुरु
कोलकाता , 24 जून (हिं.स.)।पश्चिम कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट डेपो रोडवरील तीन मजली बांधकामाधीन गोदाम अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कि
कोलकात्यात बांधकामाधीन तीन मजली गोदाम कोसळून अपघात; पाच जणांचा मृत्यू,बचावकार्य सुरु


कोलकाता , 24 जून (हिं.स.)।पश्चिम कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट डेपो रोडवरील तीन मजली बांधकामाधीन गोदाम अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून अनेक जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोलकाता पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १० जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ब्रिज ब्रिजजवळ घडली. बचाव पथकाचे सदस्य अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी गोदामाच्या छताचे काँक्रीट ओतण्याचे (कास्टिंग) काम सुरू होते. इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला तयार झाला होता, तर तळमजल्यावर बांधकाम सुरू होते. त्याच वेळी संपूर्ण इमारत अचानक कोसळली. त्यामुळे लोखंडी बीम आणि काँक्रीटचा प्रचंड ढिगारा तयार झाला आणि तेथे काम करणारे अनेक मजूर त्याखाली अडकले.

घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे. कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट (डीएमजी), नागरी संरक्षण विभाग आणि अग्निशमन दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कराचे अधिकारीही बचाव मोहिमेत मदत करत आहेत. लोखंडी बीम आणि काँक्रीटचे अवशेष हटविण्यासाठी गॅस कटर आणि उभ्या ड्रिलिंग यंत्रांचा वापर केला जात आहे. तसेच जड ढिगारा हटविण्यासाठी क्रेन आणि अन्य अवजड यंत्रसामग्रीची मदत घेतली जात आहे.अग्निशमन विभागातील एका अधिकाऱ्याने आरोप केला की, या गोदामाच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनीही या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याची तक्रार केली आहे.

दुर्घटनेची गंभीरता लक्षात घेऊन शहरी विकास मंत्री अग्निमित्रा पॉल, कोलकाता महानगरपालिकेच्या आयुक्त स्मिता पांडे आणि मंत्री इंद्रनील खान घटनास्थळी दाखल झाले आहेत. भाजप नेते राकेश सिंहही तेथे उपस्थित होते. मंत्री इंद्रनील खान यांनी सांगितले की, “सध्या आमचे सर्वांत मोठे प्राधान्य म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे आहे. दुर्घटनेची कारणे आणि कोणतीही अनियमितता यांची चौकशी नंतर केली जाईल”.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सचिवालयाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांनी माहितीसाठी १०७०, ८६९७९८१०७०, ०३३-२२१४३५२६ आणि ०३३-२२५३५१८५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande