
नवी दिल्ली, 25 जून (हिं.स.)सध्या सुरू असलेल्या इबोला आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, प्रवेशाच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य पाळत ठेवण्याची यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी नागरी विमानचालन मंत्रालय आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी 'एअर सुविधा 2.0' (AIR SUVIDHA 2.0) हे अद्ययावत आणि संपर्करहित 'प्रवासी आरोग्य स्व-घोषणा पोर्टल' सुरू केले आहे.
17 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली 2005 अंतर्गत काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडामधील इबोला/बुंडिबुग्यो विषाणूच्या प्रादुर्भावाला जागतिक आरोग्य संघटनेने 'आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीतला प्रादुर्भाव हा बुंडिबुग्यो विषाणूजन्य रोग असल्याचे निश्चित झाले आहे, आणि दक्षिण सुदानसह काँगो आणि युगांडाच्या सीमेवरच्या देशांचे संसर्गाचा जास्त धोका असलेले देश म्हणून मूल्यांकन करण्यात आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या सहकार्याने विकसित केलेल्या या पोर्टलमुळे अभ्यागत आंतरराष्ट्रीय प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्सपूर्वी अनिवार्य ऑनलाइन 'आरोग्य स्व-घोषणापत्र' सादर करता येईल. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या 21 दिवसांचा प्रवासाची माहिती, संशयित रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती आणि संबंधित लक्षणे (असल्यास) नमूद करावी लागतील. हे पोर्टल विमानतळ आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन ब्युरो, आयडीएसपी आणि राज्य सर्वेक्षण अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष काळातला डेटा सामायिक करायला मदत करेल, त्यामुळे धोका असलेल्या प्रवाशांची जलद ओळख आणि त्यांना संदर्भ सेवा देणे सोपे होईल. त्याचवेळी प्रवाशांचा विमानतळावर आगमनाचा अनुभव अखंड आणि संपर्करहित राहील याची काळजी घेतली जाईल, तसेच उतरल्यानंतर कोणतेही प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही.
एअर सुविधा स्व-घोषणापत्र भारतात पोहोचण्यापूर्वी 24 तास आधी भरता येते. प्रवाशांना विनंती करण्यात येते की त्यांनी विमानात चढण्यापूर्वी, वेब चेक-इन दरम्यान फॉर्म भरावेत. यामुळे आगमनानंतर जलद क्लिअरन्स मिळेल. प्रवाशांना केवळ आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल हेल्थ डेस्क किंवा इमिग्रेशन काउंटरवर डाउनलोड केलेले स्व-घोषणापत्र दाखवणे आवश्यक आहे.
प्रवाशांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांचे स्व-घोषणापत्र आगाऊ आणि अचूकपणे भरण्याची विनंती करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे