तरुणांमध्ये जातीयवाद वाढत असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप
नागपूर, २५ जून (हिं.स.) : देशातील तरुण पिढी ज्वलंत सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा जातीपातीच्या विचारांना अधिक महत्त्व देत असल्याने त्याचा थेट फायदा भाजपला होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. दिल्लीत अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आ
प्रकाश आंबेडकर, संग्रहित फोटो


नागपूर, २५ जून (हिं.स.) : देशातील तरुण पिढी ज्वलंत सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा जातीपातीच्या विचारांना अधिक महत्त्व देत असल्याने त्याचा थेट फायदा भाजपला होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. दिल्लीत अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी ही टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र आंदोलनकर्त्याची जात समजल्यानंतर अनेकांनी पाठिंबा काढून घेतल्याचे दिसून आले. समाजातील ही मानसिकता चिंताजनक असून त्यामुळे मोठी आंदोलनेही कमकुवत होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसवर निशाणा

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. विधान परिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार प्रभावीपणे लढताना दिसले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये जाण्याची इच्छा असल्याचे सांगत, भाजपमध्ये न जाणारेच खरे विरोधक उरले असल्याचेही ते म्हणाले.महाविकास आघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा दावा करत आंबेडकर म्हणाले की, आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे राजकीय तडजोडी करत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी काही राजकीय भेटी घेतल्या असल्यास त्याबाबत जनतेसमोर खुलासा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चिंता

शेतकरी आणि कापूस उत्पादकांच्या समस्यांबाबत बोलताना आंबेडकर यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नवीन पद्धतीमुळे व्यापारी वर्गाला फायदा होत असल्याचा आरोप करत याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

धान, सोयाबीन आणि ज्वारी खरेदी केंद्रे तसेच हमीभाव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.

संघ आणि केंद्र सरकारवर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत आंबेडकर यांनी देश आर्थिक गुलामगिरीकडे ढकलला जात असल्याचा आरोप केला. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

सामान्य नागरिकांनी शासनाच्या धोरणांविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचे आवाहन करत त्यांनी सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर व्यापक जनचळवळीची गरज व्यक्त केली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande