
मुंबई, 25 जून (हिं.स.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा पाढा वाचत, महायुतीत हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना तारतम्य बाळगावं, अशी भूमिका मांडली. माध्यमांशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या खासदाराला कठोर शब्दात तंबी द्या, असं म्हणत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा संजय पाटील यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वादग्रस्त आणि अर्वाच्य भाषेचा वापर केला. संजय पाटील यांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत संजय दिना पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितल्याचं म्हटलं, मात्र याच वेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी संजय पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, याशिवाय शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा पाढा वाचत, महायुतीत हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी आजपर्यंतच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांचा एकनाथ शिंदे समोर पाढा वाचला आणि सोबतच महायुतीमध्ये हे सगळं खपून घेणार नाही, अशी सूचना सर्व आमदार-खासदारांना द्यावी, असं देखील सांगितलं. संजय दिना पाटील हे आता महायुतीचे खासदार आहेत. आता यापुढे कोणत्याही खासदार, आमदार, मंत्र्यांचे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य महायुती सहन करणार नाही असं देखील फडणवीस यांनी नमूद केलं. भविष्यात अशी घटना घडायला नको, यासाठी पक्षश्रेष्ठींनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी