
नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)। पश्चिम कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी दुपारी तीन मजली बांधकामाधीन गोदाम कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ढिगाऱ्यातून 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींसाठी ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली. राज्य सरकारदेखील पीडितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी गोदामात अनेक कामगार काम करत होते. अचानक इमारतीचा सांगाडा कोसळून संपूर्ण रचना ढिगाऱ्यात परिवर्तित झाली. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथके रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करत निष्काळजीपणाचा आरोप असलेल्या इमारत पर्यवेक्षक सय्यद मोहम्मद गुलजार तसेच दोन मजूर पुरवठादार मोहम्मद अताउल आणि सुभाष चौधरी यांना अटक केली आहे.
जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात न्यूरोलॉजी आणि अस्थिरोग तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode