
मुंबई, 25 जून (हिं.स.) - पत्रकारांशी अयोग्य भाषेत बोलल्या प्रकरणी माझं खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांचा तसं बोलण्याचा उद्देश नव्हता. संजय दिना पाटील यांच्या मनात पत्रकारांबाबत कोणताही राग नाही. पत्रकारांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य आमच्यासारख्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने करुही नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं आहे की, आपल्याकडून पत्रकारांचा अपमान करणारे काही शब्द गेले असतील तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिवसेना उबाठा पक्षातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी शिवीगाळ केली आहे. त्यामुळे पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज संजय दिना पाटील यांच्या विरोधात बोलतात. रोज त्यांच्याबद्दल अपशब्द काढतात. तोडून टाका, मारुन टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे शब्द मीडियासमोर वापरतात. खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय-काय बोलतात ते आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी, माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत, असे म्हटले होते. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाची नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परखड प्रश्न विचारणाऱ्यांना पत्रकारांसोबत संजय दिना पाटील यांनी गैरवर्तन केले. मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे. यावेळी संजय दिना पाटील हे प्रसारमाध्यमांवरही संतापले. तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता, आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय.
माझा शिवसैनिकांसोबत कोणताही वाद नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही माझ्यावर उपकार आहेत. त्यांच्यामुळे मी खासदार झालो. जे नेते माझ्याविरोधात बोलत आहे, ते स्वत:ची सुरक्षा सोडून इकडे काही करायला येणार आहेत का? हे काही करणार, तेव्हा आम्ही मार खाऊन घ्यायचा का? हे लोक स्वत:च्या दादा लोकांकडून फोन करतात, सिक्युरिटीसाठी, ती केस पण दाबून टाकली. ती केस काढायला सांगा ना. मी संजय राऊत यांना खूप मानसन्मान दिलाय. 2004 मध्ये शिवसेनेच्या लीलाधार डाके यांच्याविरोधात मी निवडून आलो तेव्हा संजय राऊत यांनी मला मदत केली. किरीट सोमय्या यांच्याविरोधातही त्यांनी मला मदत केली होती. ही शिवसेनेविरोधात गद्दारी नव्हती का? आम्ही पाच लोकं मारली, जे बोललो ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मला दहा लोकं लागत नाहीत, मी लोकांच्या मनावर राज्य करतो. शिंदे साहेबांनी माझ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट मला शाबासकी दिली. मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे, मर्दांची कदर करतात, ते नाराजी व्यक्त करत नाहीत, शिंदे साहेबांनी मला शाबासकी दिली आहे, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी