नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणात आरोपी दोषी; शिक्षेचा निर्णय २९ जूनला
पुणे, 25 जून (हिं.स.) - महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी विशेष न्यायालयात बंद दाराआड (इन कॅमेरा) या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे
Narsapur


पुणे, 25 जून (हिं.स.) - महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी विशेष न्यायालयात बंद दाराआड (इन कॅमेरा) या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला न्यायालयाने दोषी ठरवले असून, शिक्षेची घोषणा २९ जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षा़ंच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपीने खाऊचे अमिष दाखवून साडेतीन वर्षीय मुलीला फूस लावली आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या खटल्याच्या निकालाकडे पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर नसरापूर परिसरात शांतता असून, ग्रामस्थांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात आणि न्यायालय परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. आता सर्वांचे लक्ष २९ जून रोजी जाहीर होणाऱ्या शिक्षेकडे लागले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, 'तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची? त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.

यानंतर सरकारी वकिलांनी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने 39 मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकीय तपासणीत भीमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande