राम मंदिरातील चोरी प्रकरणी 8 जणांवर एफआयआर, दोघांना अटक
- एसआयटी चौकशीनंतर मोठी कारवाई अयोध्या, २५ जून (हिं.स.) : अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगीत कथित अपहार आणि चोरी प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत 8 जणांविरोधात नामनिर्देशित एफआयआर दाखल केला आहे. ही कारवाई श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षे
राम मंदिर लोगो


- एसआयटी चौकशीनंतर मोठी कारवाई

अयोध्या, २५ जून (हिं.स.) : अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगीत कथित अपहार आणि चोरी प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत 8 जणांविरोधात नामनिर्देशित एफआयआर दाखल केला आहे. ही कारवाई श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीवर आणि विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालावर करण्यात आली आहे.

एफआयआरमध्ये रमाशंकर यादव (टिन्नू यादव), अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष, करुणेश आणि लवकुश मिश्रा यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. यापैकी अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांना अटक करण्यात आली असून, इतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मंदिरातील देणगीची मोजणी आणि व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये सहभागी होते. तक्रारीनुसार, त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मंदिराच्या देणगीत गैरव्यवहार आणि चोरी केली. एसआयटीच्या प्राथमिक चौकशीतही यासंदर्भातील पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत चोरी, अपहार, फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काळात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणातील फिर्यादी कृष्ण मोहन यांनी आरोप केला आहे की मंदिरात येणाऱ्या देणगी आणि चढावाच्या रकमेत दीर्घकाळापासून अनियमितता केली जात होती. ज्या व्यक्तींकडून कथितरीत्या रक्कम जप्त करण्यात आली आहे, त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काही राजकीय पक्ष आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यांनी तपासाच्या निष्कर्षांवर आधारित कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राम मंदिराच्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून न्यायालयीन चौकशीची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. आता एफआयआर दाखल झाल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले असून तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande