
नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळच्या आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी विमानतळाचे हस्तांतरण जीएमआर समूहाकडे करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राममोहन नायडू तसेच जीएमआर समूहाचे जी.बी.एस. राजू यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्याधुनिक पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली ती रोबोटच्या सहाय्याने करण्यात आलेली फित कापण्याची प्रक्रिया. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर रोबोटद्वारे उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर दीपप्रज्वलन करून मुख्य हस्तांतरण सोहळ्याला सुरुवात झाली.या ऐतिहासिक बदलामुळे नागपूरची हवाई जोडणी अधिक मजबूत होणार असून, विमानतळाला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसऱ्या धावपट्टीच्या उभारणीमुळे प्रवासी तसेच मालवाहतूक सेवांना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे विदर्भाच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन विकास आराखड्यानुसार नागपूरहून दुबई, सिंगापूरसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांशी जोडणी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पासाठी जीएमआर समूहाची विकासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विमानतळाच्या नव्या बोधचिन्हात नागपूरच्या ओळखीचे प्रतीक असलेले झिरो माईल आणि ‘संत्रानगरी’ची प्रतिमा प्रभावीपणे साकारण्यात आली आहे. तसेच प्रवाशांसाठी विमानतळावरील सर्व सुविधांची माहिती देणारी स्वतंत्र वेबसाइटही विकसित करण्यात आली आहे.विमानतळ विकास प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पुढील वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा असून, दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक टर्मिनल, दुसरी धावपट्टी आणि कार्गो सुविधा उभारण्यात येणार आहेत. हा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी संपूर्ण प्रकल्प २०२९ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.यावेळी बोलताना त्यांनी नागपूर विमानतळ प्रकल्प हा मध्य भारताच्या विकासाचा ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो आणि नागपूर आर्थिक प्रगतीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी