
नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)।मध्य पूर्वेतून भारताकडे येणाऱ्या 30 जहाजांनी आतापर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे, तर आणखी 26 जहाजे या महत्त्वाच्या सागरी मार्गातून मार्गक्रमण करण्यासाठी आपल्या क्रमांकाची प्रतीक्षा करत आहेत, अशी माहिती नौवहन मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी पार केलेल्या 30 जहाजांपैकी जवळपास निम्म्या जहाजांवर एलपीजी (द्रवरूप पेट्रोलियम वायू) आणि एलएनजी (द्रवरूप नैसर्गिक वायू) वाहून नेण्यात येत होते. याशिवाय, आठ जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात मालसाठा (बल्क कार्गो) होता, तर सात जहाजे कच्चे तेल वाहून नेणारी टँकर्स होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 1 मार्च ते 17 जून या कालावधीत 19 जहाजांनी हा सागरी मार्ग पार केला होता. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर आणखी 11 जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे. भारतीय बंदरांवर पोहोचलेली किंवा भारताकडे येत असलेल्या या 30 जहाजांपैकी 17 जहाजे परदेशी ध्वजाखाली नोंदणीकृत आहेत. यामध्ये सर्वाधिक पाच जहाजे मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखाली कार्यरत आहेत.
वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील फारसच्या आखातात भारतीय हितसंबंधांशी संबंधित 26 जहाजे अद्यापही तैनात आहेत. यामध्ये भारतीय ध्वजाखालील तसेच भारताकडे येणारी परदेशी ध्वजांची जहाजे यांचा समावेश आहे.या 26 जहाजांपैकी तीन जहाजांमध्ये ऊर्जा उत्पादने, 10 जहाजांमध्ये खते (फर्टिलायझर्स) आणि उर्वरित 13 जहाजांमध्ये इतर प्रकारचा माल भरलेला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. जगभरातील एकूण ऊर्जा पुरवठ्यापैकी सुमारे पाचवा हिस्सा या मार्गातून वाहतूक केला जातो. भारतासाठी हा मार्ग विशेष महत्त्वाचा आहे, कारण एलएनजी आणि एलपीजीच्या आयातीसाठी भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार असलेले अनेक आखाती देश याच प्रदेशात स्थित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode