इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाचा अलर्ट; अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन
नवी दिल्ली , 26 जून (हिं.स.)।तेहरानस्थित भारतीय दूतावासाने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच तेथे जाण्याची योजना आखणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुरक्षा सूचना जारी केली आहे. दूतावासाने सांगितले की, इराणमधील सुरक्षा परिस्थितीवर सातत
इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाचा अलर्ट; अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन


नवी दिल्ली , 26 जून (हिं.स.)।तेहरानस्थित भारतीय दूतावासाने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच तेथे जाण्याची योजना आखणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुरक्षा सूचना जारी केली आहे.

दूतावासाने सांगितले की, इराणमधील सुरक्षा परिस्थितीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अलीकडील काळात तेथील परिस्थितीत काही सकारात्मक बदल दिसून आले असून, एकूणच सुरक्षाव्यवस्थेत पूर्वीपेक्षा सुधारणा झाल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, कोणताही धोका पत्करायचा नसल्याने यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सुरक्षा सूचना अद्याप मागे घेण्यात आलेल्या नाहीत.दूतावासाने स्पष्ट केले आहे की, परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी भारतीय नागरिकांनी पुढील आदेश येईपर्यंत इराणचा कोणताही अनावश्यक प्रवास टाळावा.

सध्या इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा अत्यावश्यक कामानिमित्त तेथे जाणाऱ्या भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नेहमी सावध राहून आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती ठेवावी. तसेच, स्थानिक घडामोडींची माहिती केवळ विश्वासार्ह वृत्तस्रोतांद्वारेच घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सर्व नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

दूतावासाने आणखी एक महत्त्वाची सूचना देताना सांगितले आहे की, इराणमध्ये सध्या वास्तव्यास असलेले तसेच नव्याने तेथे पोहोचणारे सर्व भारतीय नागरिकांनी शक्य तितक्या लवकर तेहरानस्थित भारतीय दूतावासात स्वतःची माहिती नोंदवून नोंदणी करून घ्यावी.याशिवाय, कोणतेही नवीन अपडेट किंवा सुरक्षा सल्ला जाणून घेण्यासाठी भारतीय नागरिकांनी दूतावासाच्या अधिकृत संकेतस्थळासह सोशल मीडिया खात्यांवर नियमितपणे लक्ष ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी भारतीय दूतावासाने पुढील हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी केले आहेत. मोबाईल क्रमांक: +98 912 810 9115, +98 912 810 9109, +98 912 810 9102, +98 993 217 9359, ई-मेल: cons.tehran@mea.gov.in

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande