
मुंबई, 27 जून (हिं.स.)। 2005 पूर्वी छापण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा 30 जूननंतर स्वीकारल्या जाणार नाहीत, असा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या दाव्याला बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या एका कथित सूचनेचा आधार देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा छुप्या पद्धतीने नोटबंदी करण्यात आली की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत स्पष्टीकरण देत व्हायरल होत असलेला फोटो आणि त्यामधील दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. बँकेने म्हटले आहे की, 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा 30 जूननंतर शाखांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत, असा कोणताही आदेश बँकेने दिलेला नाही. ग्राहकांनी अशा भ्रामक संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच ते पुढे शेअर करू नयेत. अधिकृत माहितीसाठी केवळ बँकेच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
काही माध्यमांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने असा आदेश दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर इतर बँकाही अशाच प्रकारचे निर्णय घेऊ शकतात, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या अधिकृत खुलाशानंतर या अफवांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनही 2005 पूर्वीच्या नोटा अवैध ठरवण्याचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार अधिक सुरक्षित वैशिष्ट्ये असलेल्या नव्या नोटा चलनात आणण्यासाठी बँकांकडे जमा होणाऱ्या जुन्या नोटा पुन्हा ग्राहकांना वितरित करू नयेत, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्या नोटांची कायदेशीर वैधता कायम असल्याचे त्यावेळीही स्पष्ट करण्यात आले होते.
याशिवाय, 9 जून 2026 रोजी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पाठवलेल्या परिपत्रकातही 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून हळूहळू मागे घेतल्या जात असल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 2005 पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा किंवा त्या स्वीकारल्या जाणार नसल्याचा दावा दिशाभूल करणारा असून नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule