
कुशीनगर, 30 जून (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिर आणि मुख्यमंत्री यांना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुशीनगर जिल्ह्यातील 15वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याचे समोर आले. आवश्यक तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री संबंधित अल्पवयीनाने गोरखपूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांना मोबाईलवरून फोन करून गोरखनाथ मंदिर आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली.मोबाईल लोकेशनच्या आधारे गोरखपूर आणि पटहेरवा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी पहाटे कुशीनगर जिल्ह्यातील बलुआ तकिया गावात छापा टाकून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे तसेच तो अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांच्या नोंदीनुसार, 2025 मध्येही त्याने श्रीराम मंदिर उडवून देण्याच्या धमक्या तीन वेळा दिल्या होत्या. त्यावेळीही त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली नव्हती.स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अल्पवयीनाच्या आई-वडिलांमध्ये दीर्घकाळापासून कौटुंबिक वाद असून ते वेगवेगळे राहतात. तो सध्या आपल्या 70 वर्षीय आजीसोबत राहत असून दिवसभर गावात भटकत असतो. पटहेरवा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रविंद्र कुमार राय यांनी सांगितले की, गोरखपूर पोलिसांनी चौकशीसाठी अल्पवयीनाला ताब्यात घेतले होते. आवश्यक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी