
मुंबई, 27 जून (हिं.स.)। गुगलने दीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या गुगल फायनान्स या वित्तीय सेवेला स्वतंत्र अँड्रॉइड ऍपच्या स्वरूपात अधिकृतपणे लॉन्च केले आहे. अनेक वर्षे ही सेवा केवळ बीटा वेब इंटरफेसपुरती मर्यादित होती. आता हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. हे ऍप अँड्रॉइड स्मार्टफोनसह टॅबलेटसाठीही उपलब्ध करण्यात आले आहे. यापूर्वी गुगलने जुने फायनान्स ऍप बंद केल्याने अनेक वापरकर्त्यांची निराशा झाली होती. मात्र, आता नव्या सुविधांसह या ऍपचे पुनरागमन झाले आहे.
वेब आवृत्तीप्रमाणेच नव्या ऍपमध्ये वापरकर्त्यांना स्वतःची वॉचलिस्ट पाहता येणार असून शेअर बाजारातील रिअल-टाइम माहिती मिळणार आहे. तसेच वॉचलिस्टमधील शेअर्सशी संबंधित वैयक्तिकृत आर्थिक बातम्यांचा लाइव्ह फीडही उपलब्ध आहे. याशिवाय एआय-आधारित रिसर्च टूल आणि ‘की मोमेंट्स’ हे नवे फीचर देण्यात आले असून एखाद्या शेअरच्या किमतीत झालेल्या बदलामागील कारणे समजून घेण्यास त्याची मदत होणार आहे.
गुगलने स्पष्ट केले आहे की, सध्या मोबाईल ऍपमध्ये वेब आवृत्तीतील सर्व सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र, येत्या काही महिन्यांत लाइव्ह अर्निंग्स कॉल्स, पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि टास्क्स यांसारखी वैशिष्ट्येही ऍपमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. वेब आवृत्तीमध्ये नव्याने पोर्टफोलिओ ट्रॅकिंग सुविधा देण्यात आली असून वापरकर्त्यांना स्क्रीनशॉट, पीडीएफ किंवा सीएसव्ही फाइल अपलोड करून तसेच एआयच्या मदतीने पोर्टफोलिओ तयार करता येणार आहे. त्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील विविध प्रश्न विचारून एआयकडून विश्लेषण मिळू शकणार आहे. तसेच दररोजच्या प्री-मार्केट ब्रीफिंगसह शेअर्स आणि क्रिप्टोकरन्सीमधील घडामोडींची माहिती आणि वैयक्तिकृत सूचना थेट मोबाईलवरही मिळणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule