आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त ICAI कडून राष्ट्रीय 'स्केलअप इंडिया समिट २०२६'चे आयोजन
* एमएसएमई आणि स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यावर भर • धोरणात्मक सुधारणा, नियामक अनुपालन आणि वित्तपुरवठा या विषयांवर समिटमध्ये विशेष भर. एमएसएमई आणि स्टार्टअप परिसंस्थेला मार्गदर्शन आणि बळकटी देण्याचे उद्दिष्ट • देशभरातील १८६ शाखा आणि ५ प्रादेशिक प
स्केलअप इंडिया समिट


* एमएसएमई आणि स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यावर भर

• धोरणात्मक सुधारणा, नियामक अनुपालन आणि वित्तपुरवठा या विषयांवर समिटमध्ये विशेष भर. एमएसएमई आणि स्टार्टअप परिसंस्थेला मार्गदर्शन आणि बळकटी देण्याचे उद्दिष्ट

• देशभरातील १८६ शाखा आणि ५ प्रादेशिक परिषदांमार्फत ICAI MSME क्लिनिकचे आयोजन, एमएसएमईंसाठी मोफत सल्लागार सेवा उपलब्ध

मुंबई, 27 जून (हिं.स.) - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI)च्या एमएसएमई आणि स्टार्टअप समितीच्या वतीने २६ आणि २७ जून २०२६ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी दोन दिवसीय ICAI स्केलअप इंडिया समिट २०२६ यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.

या समिटला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, लघु उद्योग भारती, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, एनएसई, आय-हब, CAIT, AIAI, फिक्की FLO, SIDBI, आघाडीच्या बँका आणि इकोसिस्टीम भागीदार यांचे सहकार्य लाभले.

दोन दिवसांच्या या समिटमध्ये धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, चार्टर्ड अकाउंटंट्स,स्टार्टअप्स, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील प्रमुख भागधारक सहभागी झाले. NABARD, बँक ऑफ इंडिया, NaBFID, बँक ऑफ बडोदा, NKGSB को-ऑपरेटिव्ह बँक, टी-हबचे मुख्य वित्त अधिकारी, आय-हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई तसेच इतर आघाडीच्या वित्तीय संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. एमएसएमई आणि स्टार्टअप परिसंस्थेसमोरील महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी चर्चा केली.

समिटच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ICAIचे अध्यक्ष सीए. प्रसन्न कुमार डी आणि उपाध्यक्ष सीए. मंगेश किनारे यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन झाले. यावेळी एमएसएमई आणि स्टार्टअप समितीचे अध्यक्ष सीए. ज्ञान चंद्र मिश्रा, उपाध्यक्ष सीए. संजय कुमार अग्रवाल तसेच ICAIच्या केंद्रीय परिषद आणि प्रादेशिक परिषदांचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी ICAIचे अध्यक्ष सीए. प्रसन्न कुमार डी म्हणाले, “ICAI स्केलअप इंडिया समिटच्या माध्यमातून आम्ही एमएसएमई आणि स्टार्टअप्सना एका समान व्यासपीठावर आणत आहोत. कल्पनेचे उद्योगात आणि उद्योगाचे यशस्वी व्यवसायात रूपांतर करण्याचा संपूर्ण उद्योजकीय प्रवास समजून घेण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल. चार्टर्ड अकाउंटंट्सना व्यावसायिक परिसंस्था, आर्थिक विकास आणि उद्योग उभारणीच्या प्रत्येक टप्प्याचे सखोल ज्ञान असते. त्यांच्या अनुभवामुळे ते उद्योजकांना सुरुवातीपासून व्यवसायाचा विस्तार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रभावी मार्गदर्शन करू शकतात. राष्ट्रनिर्मितीतील विश्वासार्ह भागीदार म्हणून ICAI उद्योजकांना सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आणि आवश्यक ज्ञान उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि पाठबळही संस्था पुरवेल.”

या समिटचे प्रमुख आकर्षण म्हणजे “स्टार्टअप –स्केलअप टँक”. निवडक स्टार्टअप्सना आपल्या व्यावसायिक संकल्पना गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर मांडण्याची संधी मिळाली. त्यातून सहकार्य, गुंतवणूक आणि व्यवसायवृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. समिटसाठी १०० हून अधिक स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती. त्यापैकी सर्वोत्तम १२ स्टार्टअप्सना देशातील सहा प्रमुख व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली.

ICAIचे उपाध्यक्ष सीए. मंगेश किनारे म्हणाले, “एमएसएमई परिसंस्थेला चालना देणे आणि अधिकाधिक उद्योगांनी एमएसएमई नोंदणी करावी, या उद्देशाने या कार्यक्रमाची संकल्पना मांडण्यात आली आहे. भारत सरकारने एमएसएमईंसाठी अनेक योजना आणि सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यांचा लाभ अनेक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेला नाही. विविध सरकारी योजना आणि लाभांविषयी व्यापक जनजागृती करून ही दरी कमी करण्याचे उद्दिष्ट ICAIने ठेवले आहे.”

समिटमध्ये विविध तांत्रिक सत्रे आणि परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. त्यात 'द नेक्स्ट बिग वेव्ह : स्टार्टअप्स शेपिंग टुमॉरोज इंडस्ट्रीज', 'मॅपिंग द फ्युचर ऑफ स्टार्टअप इनोव्हेशन अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रोफेशनल्स', 'डेटा प्रोटेक्शन अँड सायबर सिक्युरिटी फॉर न्यू इकॉनॉमी', 'फ्युचर इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड व्हेंचर कॅपिटल', 'एमएसएमई समाधान आणि ODR च्या माध्यमातून पेमेंट संकटाचे निराकरण', 'एसएमई आयपीओ', 'एमएसएमई वर्किंग कॅपिटल फायनान्स', 'GeM पोर्टल', 'ECLGS 5.0', 'डिजिटल मार्केटप्लेसेस : एमएसएमई विक्रेत्यांसाठी सरकारी बाजारपेठेचे प्रवेशद्वार' अशा समकालीन विषयांचा समावेश होता.

याशिवाय NeSL, NaBFID, Ratnaafin Capital, SEBI आणि M1xchange यांसह उद्योग, वित्त आणि धोरण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. नवोपक्रम, वित्तपुरवठ्याची उपलब्धता आणि व्यवसाय विस्तार या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

ही समिट ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरली. उद्योजकतेला चालना देणे, एमएसएमई क्षेत्र अधिक सक्षम करणे आणि व्यावसायिक उत्कृष्टता तसेच धोरणात्मक सहभागाच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाला पाठबळ देण्याची ICAIची बांधिलकी या समिटमधून पुन्हा अधोरेखित झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande