
वॉशिंग्टन, 27 जून (हिं.स.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी याला दुजोरा दिला आहे. रुबियो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते स्वतः ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भारत दौऱ्याच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहेत आणि त्यासाठी ते लवकरच भारताला भेट देतील. रुबियो म्हणाले की, ट्रम्प प्रशासन पुढील वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तयारी करत आहे. यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये वाढणारी जवळीक अधोरेखित होते, कारण दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या जवळ पोहोचले आहेत.
दरम्यान, पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र कसे काम करू शकतात, असे विचारले असता मार्को रुबियो म्हणाले, मला वाटते की, भारत बऱ्याच काळापासून आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याचा विचार करत आहे आणि मला वाटते की हा कल पुढेही चालू राहील आणि आम्हाला निश्चितपणे त्याचा एक भाग व्हायचे आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणाले, भारताच्या ऊर्जेच्या गरजांसाठी आमच्याकडे काही उपाय आहेत, असा आमचा विश्वास आहे. पण त्याव्यतिरिक्त, मी हेही सांगेन की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्य-पूर्वेत शांततेसाठी पावले उचलण्यामागे एक कारण हे आहे की, आपल्या मित्र राष्ट्रांसाठी बाजारात अधिक इंधन उपलब्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. पण मला वाटते की पुरवठ्यामध्ये विविधता आणणे हाच खरा दीर्घकालीन उपाय आहे, आणि मला माहित आहे की भारत केवळ अमेरिकेशीच बोलत नाही, तर व्हेनेझुएलासोबतही त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी खूप जवळून काम करत आहे. व्हेनेझुएलामध्ये उत्पादित होणाऱ्या जड कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शेवटचा भारत दौरा फेब्रुवारी २०२० मध्ये केला होता. त्या दौऱ्यादरम्यान, त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाला संबोधित केले. त्यानंतर नवी दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्या दौऱ्यापासून अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नियमित संवाद होत आहे. दोन्ही देश व्यापार, संरक्षण तंत्रज्ञान आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे 'क्वाड'चे सदस्य आहेत. हे चार देश प्रादेशिक सुरक्षा, महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, मजबूत पुरवठा साखळी आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत आहेत. वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली या दोन्ही देशांनी आपल्या भागीदारीला २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक संबंधांपैकी एक म्हणून संबोधले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे