
इस्लामाबाद , 26 जून (हिं.स.) पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानातून झालेल्या ड्रोन हल्ल्यांसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. गेल्या आठवड्यात अफगाण तालिबानच्या सैन्याने पाकिस्तानातील दोन प्रांतांमध्ये आयसिस च्या तळांवर ड्रोनद्वारे हल्ले केले होते. तालिबानच्या या कारवाईमुळे पाकिस्तानची लष्कर आणि सरकार दोन्हीही हादरले आहेत. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर नवे आरोप करण्यात येत आहेत.
एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात पत्रकार अबसार आलम यांनी ख्वाजा आसिफ यांना विचारले की, भारताने औषधांच्या खेपेमार्फत अफगाणिस्तानात ड्रोन पाठवले असल्याचा दावा केला जात आहे, त्यात कितपत तथ्य आहे? यावर उत्तर देताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, “यामध्ये शंभर टक्के सत्य असू शकते.” तसेच, “याबाबत मला कोणतीही शंका नाही. भारत गुप्तपणे नव्हे, तर उघडपणे अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रे पाठवत असावा,” असा दावाही त्यांनी केला.
प्रत्यक्षात, पाकिस्तान या संपूर्ण प्रकरणाचा भारताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात भारताने अफगाणिस्तानला ५ टन औषधांची खेप पाठवली होती. ही काही नवीन बाब नाही. भारत गेल्या अनेक वर्षांपासून मानवतावादी मदतीचा भाग म्हणून अफगाणिस्तानला आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य पुरवत आला आहे. त्याच परंपरेनुसार यावेळीही औषधांची मोठी खेप पाठवण्यात आली होती.
भारताने औषधांची खेप पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, गुरुवारी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांतील आयसिसच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ले झाले. त्यानंतर पाकिस्तानने या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध जोडण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचा दावा आहे की, भारताने औषधांच्या आडून ड्रोन अफगाणिस्तानात पाठवले आणि त्याच ड्रोनचा वापर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला.
पाकिस्तान सातत्याने भारतावर आरोप करत असला, तरी अलीकडील काळात पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानातील अनेक भागांवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानी लष्कराने काबूल आणि कंदहारसह अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले केल्याचे वृत्त आहे.याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानातील सत्ताधारी अफगाण तालिबानने आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमावर्ती भागातील गोळीबारानंतर तालिबानने ड्रोन हल्ल्यांद्वारे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, सीमावर्ती भागातील वाढता तणाव आणि स्वतःसमोरील सुरक्षा आव्हाने मान्य करण्याऐवजी पाकिस्तान भारतावर आरोप करत असल्याचे दिसून येते. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये अनेक वर्षांपासून विविध सशस्त्र बंडखोर संघटना सक्रिय असून, या भागांत पाकिस्तानी लष्कर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode