
नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)। देशातील सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून इंडिया सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत आतापर्यंत 12 चिप उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये सुमारे 1.64 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना असून, देशात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योग उभारण्यासाठी ही मोठी झेप मानली जात आहे. सरकारने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार या प्रकल्पांमध्ये एक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट, दोन कंपाऊंड सेमीकंडक्टर फॅब युनिट्स आणि नऊ चिप पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2026-27 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची घोषणा केली असून या टप्प्यात सेमीकंडक्टर उपकरणे, कच्चा माल, स्वदेशी बौद्धिक संपदा आणि मजबूत पुरवठा साखळी विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे देशातील चिप उत्पादन उद्योग अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
सेमीकंडक्टर डिझाइन क्षेत्रातही भारताची प्रगती वेगाने सुरू आहे. डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत 24 प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच 105 कंपन्यांना अत्याधुनिक चिप डिझाइन साधनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विविध फाउंड्रीमध्ये 23 डिझाइन टेपआउट्स यशस्वीपणे पूर्ण झाले असून, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित चिप डिझाइन विकसित करण्याची भारताची क्षमता अधिक मजबूत होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही इंडिया एआय मिशनअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. 10,372 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या योजनेत 45 हजारांहून अधिक ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सची सामायिक संगणकीय सुविधा उभारण्यात आली आहे. संशोधन आणि नवउद्योगांना आवश्यक असलेली संगणकीय क्षमता उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय भाषण, मजकूर आणि दृश्य विश्लेषणासाठी 15 मोठ्या आणि लहान भाषा नमुन्यांना सहाय्य दिले जात आहे.
एआय कोश या व्यासपीठावर सध्या 12,519 माहिती संच, 307 कृत्रिम बुद्धिमत्ता नमुने आणि 20 विविध साधनसंच उपलब्ध आहेत. संशोधक आणि नवउद्योजकांसाठी ही साधने खुली करण्यात आली आहेत. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये 27 माहिती व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून 684 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. सरकारच्या मते, सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीमुळे देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगाला मोठी चालना मिळाली असून हा उद्योग 13 लाख कोटी रुपयांच्या मूल्यापर्यंत पोहोचला आहे. भारत आज जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला असून तंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्रात देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule