भारताच्या आक्षेपांनंतरही तिस्ता नदी प्रकल्पाला चीनचा पाठिंबा कायम
नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.) : भारताच्या तीव्र आक्षेपांकडे दुर्लक्ष करत चीनने बांग्लादेशातील तिस्ता नदी सर्वसमावेशक व्यवस्थापन व पुनर्संचयितीकरण प्रकल्प (टीआरसीएमआरपी) याला पुन्हा एकदा ठाम पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, बांग्लादेशासोबतचे सहकार्य कोणत्
तिस्ता नदीचे संग्रहित छायाचित्र


नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.) : भारताच्या तीव्र आक्षेपांकडे दुर्लक्ष करत चीनने बांग्लादेशातील तिस्ता नदी सर्वसमावेशक व्यवस्थापन व पुनर्संचयितीकरण प्रकल्प (टीआरसीएमआरपी) याला पुन्हा एकदा ठाम पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, बांग्लादेशासोबतचे सहकार्य कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या प्रभावापासून मुक्त असावे, अशी भूमिका चीनने स्पष्ट केली आहे.

चीनच्या बिजींग येथे आयोजित पत्रकार परिषदेत चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले की, चीन आणि बांग्लादेश यांच्यातील सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करणारे नाही आणि त्यावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा प्रभाव असू नये. भारताने व्यक्त केलेल्या सुरक्षा चिंतेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. तिस्ता नदी खोरे भारताच्या ईशान्य भागाजवळ असल्याने ढाका-बीजिंगच्या संयुक्त उपक्रमाबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, चीनने हा प्रकल्प बांग्लादेशातील जनतेच्या उपजीविकेशी संबंधित असून देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हंटले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास चीन तयार असल्याचेही जियाकुन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे तज्ज्ञ प्रथमच या प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अभ्यास करणार आहेत. या अभ्यासातून प्रकल्पाची उपयुक्तता सिद्ध झाल्यास चीन सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले.बांग्लादेश आणि चीन यांनी तिस्तासह बांग्लादेशातील नद्यांच्या व्यवस्थापनासाठी परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत सहमती दर्शविली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात बांग्लादेश जल विकास मंडळ आणि चीनची सरकारी कंपनी पॉवर चायना यांच्यात तिस्ता प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची (एमओयू) मुदत वाढविण्यात आली होती.

भारताची प्रमुख चिंता म्हणजे या प्रकल्पात चीनचा वाढता सहभाग. तिस्ता नदीचा परिसर सामरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ आहे. हा कॉरिडॉर भारताच्या ईशान्य राज्यांना उर्वरित देशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने या भागातील चीनची वाढती उपस्थिती भारताच्या सुरक्षा दृष्टीने चिंतेचा विषय मानली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande