टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करणार - मंत्री दादा भुसे
- पुढील वर्षापासून सर्वच परीक्षा ‘ऑनलाइन’ घेण्याची तयारी मुंबई, 29 जून (हिं.स.) - शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करणार असल्याचे शिक्षण मंत्री दादा
दादा भुसे


- पुढील वर्षापासून सर्वच परीक्षा ‘ऑनलाइन’ घेण्याची तयारी

मुंबई, 29 जून (हिं.स.) - शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करणार असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज जाहीर केले. २८ जून २०२६ रोजी होणारा टीईटीचा पेपर आदल्याच दिवशी फुटल्याचे उघडकीस आला. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली.

मंत्री भुसे यांनी केलेल्या सविस्तर निवेदनात म्हटले की, पोलिसांना २७ जून २०२६ रोजी टीईटीची प्रश्नपत्रिका विकली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्या तपासात २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेचे मूळ पेपर आढळून आले. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नपत्रिकांची खातरजमा केली असता, त्या खऱ्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मुख्य आरोपी राजू श्री प्रयाग शाव याच्यासह इतर दोघांविरुद्ध भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २८१/२०२६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम २०२४ च्या कडक कलमान्वये कारवाई करण्यात आली असून, तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता, पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ठाणे शहर पोलीस सह-आयुक्त (गुन्हे) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या रॅकेटची मुळे शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके बिहारला, तर प्रत्येकी एक पथक हरियाणा आणि दिल्लीला रवाना करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची चाचपणीही सरकार करत आहे.

शिक्षण मंत्र्यांनी उमेदवारांना दिलासा देताना जाहीर केले की, ही फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, कारण त्यांचे शुल्क आधीच स्वीकारण्यात आले आहे. तसेच, पुढील वर्षापासून टीईटीसह सर्वच परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने ‘ऑनलाइन’ घेता याव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande