
- याचिकेवर नियमित सुनावणीतच होणार विचार
अयोध्या, 29 जून (हिं.स.) : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. उन्हाळी सुट्टीनंतर नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर याचिकेवर सुनावणी झाली तरी कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
याप्रकरणी 2 वकिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत राम मंदिरातील देणगी निधीतील कथित चोरीची सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांकडून न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासावर विश्वास वाटत नसल्याचा दावा करत, महत्त्वाचे पुरावे योग्य प्रकारे जतन केले जात नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. शील नागू यांच्या खंडपीठाने तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळून लावत, या प्रकरणाची सुनावणी 12 ते 17 जुलैदरम्यान होणाऱ्या नियमित कामकाजाच्या आठवड्यात घेतली जाईल, असे सांगितले.दरम्यान, उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या आरोपांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ट्रस्टने निष्पक्ष तपासासाठी आपली बांधिलकी कायम असल्याचे सांगत, चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिल्याची पुष्टी केली आहे.तसेच, रामभक्तांनी भगवान श्रीरामांना अर्पण केलेल्या सर्व मौल्यवान वस्तू, चांदीच्या विटा आणि दागिने पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा संपूर्ण हिशेब ट्रस्टकडे असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी