सोपोरमध्ये दहशतवादी अड्ड्यावर कारवाई; शस्त्र साठा जप्त
बारामुला, 29 जून (हिं.स.) : उत्तर काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोर परिसरात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांच्या एका गुप्त अड्ड्याचा पर्दाफाश केला. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक साहित्य जप्त क
संग्रहित


बारामुला, 29 जून (हिं.स.) : उत्तर काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोर परिसरात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांच्या एका गुप्त अड्ड्याचा पर्दाफाश केला. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले असून, ही कारवाई दहशतवादाविरोधातील मोठे यश मानली जात आहे.

लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्त मोहीम राबवली. सोपोरच्या बाहेरील भागात दहशतवाद्यांनी शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली.अनेक तास चाललेल्या या शोधकारवाईत जवानांना जुन्या बंकरसदृश ठिकाणाचा शोध लागला. बंकरची तपासणी आणि उत्खनन केल्यानंतर तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक सामग्री हस्तगत करण्यात आली.

याबाबत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांवरून दहशतवादी मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, वेळेत कारवाई केल्यामुळे त्यांचा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलांना यश आले. परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू असून संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी यूएपीए (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक पथक जप्त साहित्याची तपासणी करत असून, शस्त्रास्त्रांचा स्रोत आणि त्यामागील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. गेल्या एका महिन्यात सोपोरमध्ये झालेली ही चौथी मोठी शस्त्रसाठ्याची जप्ती आहे.

सुरक्षा यंत्रणांनी या कारवाईला खोऱ्यात दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या 'ऑपरेशन ऑलआउट' अंतर्गत मिळालेले महत्त्वपूर्ण यश असे संबोधले आहे. तसेच नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande