
नवी दिल्ली, 29 जून (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात देशातील शूर जवानांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
देशभरातील शौर्याचा सन्मान
या समारंभातून भारतीय सैन्य, हवाई दल आणि पोलिस दलातील जवानांच्या अतुलनीय धैर्याला राष्ट्राने सलाम केला. विविध मोहिमांतील त्यांच्या कामगिरीमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा हातभार लागल्याचे या सन्मानातून अधोरेखित झाले. यावेळी ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याला वीर चक्र
या सन्मानांमध्ये भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांना वीर चक्र प्रदान करण्यात आले. “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान त्यांनी सुखोई-30 एमकेआय विमानातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर झालेल्या हवाई कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वीही त्यांच्या सेवेला मान्यता मिळाली असून त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.
सीमाभागातील कारवाईत पराक्रम
लोकेशन ऑफ कंट्रोल (एलओसी) परिसरात तीन दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला यांनाही वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच, अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात झालेल्या लष्करी मोहिमेत शौर्य दाखवणाऱ्या मेजर आदित्य प्रताप सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
नक्षलविरोधी मोहिमेत पोलिसांचे धैर्य
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इन्स्पेक्टर लक्ष्मण केवट आणि इन्स्पेक्टर रामेश्वर प्रसाद देशमुख यांनाही शौर्य चक्र देण्यात आले.दोन्ही अधिकाऱ्यांनी 16 एप्रिल 2024 रोजी झालेल्या चकमकीत नेतृत्व करत जखमी जवानांचे प्राण वाचवत मोहीम यशस्वी केली होती.
मरणोत्तर कीर्ती चक्र
शिपाई जंजाल प्रवीण प्रभाकर यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. जुलै 2024 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करत वीरमरण पत्करले.त्यांच्या आईने पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भावनिक आलिंगन दिले, ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावुक झाले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी