
नवी दिल्ली , 29 जून (हिं.स.) ।२०२४ मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, यावर्षाअखेरीस बांगलादेशात परतण्याची माझी योजना आहे आणि मला मृत्यूची कोणतीही भीती नाही.मात्र, त्यांच्या या विधानाला राजकीय विरोधकांनी देशातील सध्याचे राजकीय वातावरण अस्थिर करण्याचा आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे.
ढाक्यातील राजकीय वर्तुळात बंदी घालण्यात आलेल्या अवामी लीग पक्षाची ग्रामीण आणि शहरी भागात पुन्हा सक्रियता वाढत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच हसीना यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. पक्षाच्या या कथित पुनरुज्जीवनाच्या पार्श्वभूमीवर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने अवामी लीगच्या सदस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवता येणार आहे.
वृत्तानुसार, अवामी लीग हा केवळ एक राजकीय पक्ष नसून एक मोठी शक्ती असल्याचे सांगत हसीना म्हणाल्या की, “अल्पसंख्याकांवरील प्रत्येक हल्ला हा बांगलादेशच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “माझे पुनरागमन ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. हा बांगलादेशातील जनतेचे राजकीय हक्क, लोकशाहीची पुनर्स्थापना, कायद्याचे राज्य आणि आपल्या मुक्तिसंग्रामाच्या मूल्यांचे संरक्षण यांच्याशी संबंधित मोठा प्रश्न आहे.”
हसीना यांनी यावर्षी देशात परतण्याचा दावा केल्यानंतर सत्ताधारी बीएनपी आणि विरोधी जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांनी त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाची आणि त्यांच्याविरोधातील प्रलंबित खटल्यांची आठवण करून दिली. यावर प्रत्युत्तर देताना हसीना म्हणाल्या, “मला मृत्यूची भीती नाही. १९७५ मध्ये मी माझे आई-वडील, भाऊ आणि जवळपास संपूर्ण कुटुंब गमावले. माझ्यावर ग्रेनेड हल्ला करून मला ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. माझ्याविरोधात अनेक कट रचले गेले, पण प्रत्येक कट मोडून मी बांगलादेशच्या जनतेसोबत ठामपणे उभी राहिले.”त्यांनी स्वतःविरोधात सुनावण्यात आलेला मृत्युदंडाचा निर्णय बेकायदेशीर, असंवैधानिक आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला.
हसीना यांनी तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान बीएनपी सरकार तसेच मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या अंतरिम सरकारवरही जोरदार टीका केली.त्या म्हणाल्या, “देशात लोकशाही नाही, कायद्याचे राज्य नाही, नागरिकांची सुरक्षितता नाही. अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. अल्पसंख्याकांवरील हल्ले वाढले असून, अतिरेकी विचारसरणी वेगाने पसरत आहे.”
दुसरीकडे, पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ सूत्राने हसीना यांचे दावे फेटाळून लावत म्हटले की, आम्हाला त्यांच्या विधानांची कोणतीही चिंता नाही. त्या आणि त्यांच्या पक्षाकडून अशा प्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जातात. सरकारवर दबाव आणण्याची ही एक राजकीय रणनीती असू शकते. मात्र, आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलेले सरकार आहोत आणि जनता आमच्या पाठीशी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode