अमरनाथ यात्रा २०२६: नायब राज्यपाल मनोज सिन्हांनी केली पहिली पूजा, यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार
जम्मू, 29 जून (हिं.स.) : नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी सकाळी बाबा अमरनाथ यांच्या पवित्र गुहा मंदिरात पहिली पूजा करून अमरनाथ यात्रेचा औपचारिक शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी देशवासियांच्या सुख, समृद्धी, शांती, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी
नायब राज्यपाल मनोज सिन्हांनी केली पहिली पूजा


जम्मू, 29 जून (हिं.स.) : नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी सकाळी बाबा अमरनाथ यांच्या पवित्र गुहा मंदिरात पहिली पूजा करून अमरनाथ यात्रेचा औपचारिक शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी देशवासियांच्या सुख, समृद्धी, शांती, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी बाबा बर्फानी यांच्याकडे प्रार्थना केली.

देशभरातील भाविकांना मोठ्या संख्येने बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी येण्याचे आवाहन करताना नायब राज्यपाल म्हणाले की, ३ जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासन, श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळ, लष्कर, पोलीस, सुरक्षा दल, स्थानिक समुदाय, सेवा पुरवठादार आणि स्वयंसेवक पूर्ण समन्वयाने काम करत आहेत. यात्रेकरूंना सुरक्षित, सुलभ आणि अविस्मरणीय यात्रेचा अनुभव देणे हे उद्दिष्ट आहे.

ते म्हणाले की, यावर्षी यात्रा मार्गावरील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात आल्या असून यात्रेकरूंच्या सोयीसाठी विविध व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांच्या सहकार्याने प्रशासन यात्रेसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

श्राइन बोर्ड दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने पवित्र गुहेत पहिल्या पूजेचे आयोजन करते. यावर्षी ५७ दिवसांची बाबा अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू होऊन रक्षाबंधनाच्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी समाप्त होईल. ही यात्रा पारंपरिक पहलगाम मार्ग आणि बाल्टाल मार्ग या दोन्हीवरून एकाच वेळी आयोजित केली जाईल.

याप्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात, श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनदीप कुमार भंडारी, काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग, काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बर्डी आणि प्रशासन व पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande