



दिसपूर, 29 जून (हिं.स.)केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना फोन करून राज्यातील काही भागांतील पूर परिस्थितीची विचारपूस केली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. अमित शाह यांनी राज्यातील वाढत्या नदीच्या पातळीमुळे झालेल्या नुकसानीची आणि सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी मदत आणि बचाव कार्यांच्या प्रगतीचीही विचारपूस केली.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी गृहमंत्र्यांना राज्यात सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्यांची माहिती दिली. त्यांनी लिहिले, गृहमंत्री यांनी आम्हाला या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि सहकार्याचे आश्वासन दिले आहे. धेमाजीमधील पूर परिस्थितीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, धेमाजी जिल्ह्यातील चार महसूल मंडळांमधील ६९ गावांना पुराचा फटका बसला आहे. जवळपास 22,००० नागिरकांना याचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री शर्मा यांनी रविवारी संध्याकाळी सांगितले की, सरकार धेमाजीमधील पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या संकटामुळे आपल्या लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे, याचे आम्हाला तीव्र दुःख आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सर्व बाधित कुटुंबांची तात्काळ सुरक्षा आणि दीर्घकालीन पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार आपल्या सर्व संसाधनांचा वापर करत आहे.
ईशान्य सीमा रेल्वेने (NFR) कळवले आहे की, मुसळधार पूर आणि वेगाने होणाऱ्या धूपेमुळे अर्चीपाथर आणि सिमेन चापरी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे पुलाचा एक खांब कमकुवत झाला आहे. परिणामी, पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या निवेदनानुसार, १९६५ मध्ये बांधलेला आणि नंतर ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित केलेला हा पूल पूर्णपणे सुरक्षित स्थितीत होता. पण, सततच्या मुसळधार पावसामुळे नदीपात्राचा मोठा भाग वाहून गेल्याने पुलाचा एक खांब कमकुवत झाला, ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सेवा स्थगित करणे भाग पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे