
मुंबई, 03 जून (हिं.स.)। झी मराठीवरील ‘कमळी’ मालिका सुरुवातीपासूनच प्रेरणादायी कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं महत्त्व या मालिकेने सातत्याने मांडलं आहे. कमळीची कहाणी अनेक मुलींना मोठी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा देत आहे. सध्या मालिकेत कमळीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा दाखवला जात आहे. उच्च शिक्षणासाठी गाव सोडून नवीन शहरात आलेल्या कमळीने तिच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल यशस्वीपणे टाकले आहे. पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात तिने तब्बल ९६% गुण मिळवत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे तिचा निकाल स्वतः शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जाहीर केला जातो, ज्यामुळे हा क्षण आणखी खास ठरतो.
या ट्रॅकविषयी बोलताना कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, “कमळीसाठी हा खूप मोठा आणि भावनिक क्षण आहे. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी तिचा संघर्ष पाहिला आहे. घर सोडून शिक्षणासाठी नवीन शहरात येणं, अनेक अडचणींवर मात करणं आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं, हा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यामुळे ९६% गुण मिळवण्याचा हा क्षण फक्त कमळीचाच नाही, तर तिच्यासोबत हा प्रवास अनुभवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचाही आहे. कमळीच्या मोठ्या स्वप्नाची ही फक्त सुरुवात आहे. तिच्या कथेतून अनेक तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.”
या प्रसंगाच्या चित्रीकरणाने विजयालाही तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली. त्याबद्दल ती म्हणाली, “हा सीन करताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आमच्या वेळी टक्केवारीऐवजी सीजीपीए पद्धत होती. मी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) केले असून मला १० पैकी ८ -८.५ सीजीपीए मिळाले होते. तसेच दहावी आणि बारावीमध्येही मला ८० ते ८१ टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी असे काही मोठ सेलिब्रेशन झाल नव्हत, पण माझ्या आयुष्यात काही चांगलं घडलं की मी सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जाते. त्यामुळे हा सीन करताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.”
कमळीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा तिच्या पुढील प्रवासाची नवी सुरुवात ठरणार आहे. तिची जिद्द, मेहनत आणि शिक्षणावरील विश्वास प्रेक्षकांना पुढेही प्रेरणा देत राहणार आहे.
तेव्हा बघायला विसरू नका 'कमळी' दररोज रात्री ९ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर