
मुंबई, 03 जून (हिं.स.)। सन मराठी वरील 'सखा माझा पांडुरंग' या भक्तिमय मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. मालिकेत संत सखुबाई यांची भूमिका बालकलाकार स्वराली खोमणे हिने साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता मालिकेत संत सखूच्या निस्सिम भक्तिगाथेचं नव आवर्तन पहायला मिळणार आहे. मालिकेत ८ वर्षांची लीप घेतली जाणार असून संत सखुबाई यांची भूमिका अभिनेत्री सान्वी जांबेकर साकारणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स सेटवर पार पडली. यावेळी मालिकेतील सर्व कलाकार, मालिकेचे निर्माते संगीत कुलकर्णी व मालिकेची टीम उपस्थित होती. येत्या ४ जून पासून संत सखुबाईंच नवं आवर्तन दररोज सायंकाळी ७:३० वाजता सन मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मालिकेचे निर्माते संगीत कुलकर्णी मालिकेबद्दल म्हणाले की,
संत सखुबाई या एक सामान्य स्त्री आहेत. पण निव्वळ विठ्ठलाच्या भक्तीत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक संकटाचा सामना त्यांनी केला. आताच्या प्रत्येक स्त्रीसाठी संत सखुबाई आदर्श आहेत. मुख्य म्हणजे संत सखुबाई यांच्या बद्दल खूप कमी माहिती आहे. इतर सर्व संताबद्दल बऱ्याच पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतंय. त्यामुळे या मालिकेमुळे प्रेक्षकांना संत सखुबाईंच अस्तित्व त्यांचा खडतर प्रवास पहायला मिळतो. ८ वर्षांच्या लीप नंतर सखुबाईंची निस्सिम भक्ती, त्यांचा संघर्ष नव्याने दिसणार आहे. त्यांचा हा संघर्ष स्वतःपुरता न राहता सर्वांचा होणार आहे.
संत सखुबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांबेकर या भूमिकेबद्दल म्हणाली की, संत सखुबाई यांची भूमिका साकारायला मिळणं याहून मोठं दुसरं काही असूच शकत नाही. प्रेक्षकांनी या मालिकेवर , सखुवर प्रचंड प्रेम केलं आहे. म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. पण विठ्ठल माझ्या पाठीशी आहे त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या भूमिकेसाठी मी मालिकेचे सगळे भाग २-३ वेळा पाहीले आहेत. सखुच्या छोट्या छोट्या छटा मी लक्षात ठेवते. मालिकेची संपूर्ण टीम मला खूप मदत करते. मालिकेचा पहिला भाग शूट करताना २४ तास मी पाण्यात भिजले होते. संत सखुबाईंनी आता पर्यंत खूप सोसलं आहे. त्यामुळे या संकटांना तोंड द्यायला मी तयार आहे. प्रेक्षकांनी छोट्या सखुवर खूप प्रेम केलं तितकंच प्रेम माझ्यावरही करतील ही आशा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर