
लखनऊ , 30 जून (हिं.स.)।यमुना एक्सप्रेसवेवरील राया पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे सुमारे 3.35 वाजण्याच्या सुमारास व्होल्वो बस एका ट्रेलरवर जोरदार आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोला बस सर्व्हिसची व्होल्वो बस एका ट्रेलरवर जोरदार आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 65 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक, महावनचे उपविभागीय पोलीस अधिकारी (सीओ), राया पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी त्वरित बचाव आणि मदतकार्य सुरू केले.
या भीषण धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 20 ते 25 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी मथुरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले असून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode