
विधान परिषद उपसभापतीपदासाठी दाखल केला अर्ज
मुंबई, 30 जुलै (हिं.स.) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचे भाचे आणि शिवसेना ‘उबाठा’ गटाचे आमदार सचिन अहिर यांनी पक्षत्याग करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच त्यांनी शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
यासंदर्भातील माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून सचिन अहिर यांच्याशी संपर्क सुरू होता. उपसभापतीपदाची संधी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांचा प्रभाव असून, कामगार संघटना आणि पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला विशेषतः वरळी परिसरात मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी दावा केला की, ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षांतरामागेही सचिन अहिर यांची भूमिका होती. तसेच भविष्यात ठाकरे गटातील आणखी 12 हून अधिक आमदार शिंदे गटात येतील, असा दावाही त्यांनी केला.यापूर्वी 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर आता सचिन अहिर यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक आता अधिकच चर्चेचा विषय ठरली असून, तिच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी