
अमरावती, 05 जून (हिं.स.) :
अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेत गुरुवारी मोठी कारवाई करत दोन मालमत्ता सील केल्या. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार मध्य झोन क्र. 2 अंतर्गत राजापेठ विभागात ही कारवाई करण्यात आली.मनपाच्या माहितीनुसार, वार्ड क्र. बी-6 मधील मालमत्ता क्रमांक 807 व 807-1 वर 6 लाख 16 हजार 15 रुपयांची थकबाकी होती. वारंवार नोटिसा व पाठपुरावा करूनही कराचा भरणा न केल्याने संबंधित मालमत्ता सील करण्यात आली. तसेच त्याच वार्डातील मालमत्ता क्रमांक 31-10 वर 30 लाख 29 हजार 128 रुपयांची थकबाकी होती. मुदत देऊनही कर न भरल्याने या मालमत्तेवरही सीलिंगची कारवाई करण्यात आली.दोन्ही मालमत्तांवरील एकूण थकबाकी 36 लाख 45 हजार 143 रुपये आहे. सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने नियमानुसार ही कारवाई केली. यावेळी नर्मदा चव्हाण, फैयाज खान, सुरज चावरे, रोशन चव्हाण, धरम बिवाड आणि विशाल डीख्याव उपस्थित होते.मनपाने स्पष्ट केले की मालमत्ता कर हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा महसूल स्रोत असून, थकबाकीदारांनी तातडीने कर भरावा. अन्यथा सीलिंग, जप्ती आणि इतर कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी