
चंद्रपूर, 10 जुलै (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांच्या वाहनाचा तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात अपघात होऊन ४ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भात लावणीसाठी हे कामगार चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणात उदरनिर्वाहाच्या कामासाठी गेले होते. दरम्यान त्यात २७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील कामगार दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणात गेले होते. शेतातील काम आटोपून आपल्या निवासाच्या ठिकाणी परतत असताना त्यांच्या वाहनाला रामगुंडम परिसरात भीषण अपघात झाला. वाहन पलटी झाले.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये अतुल वासुदेव सोनले (४५), अर्चना जनार्धन सोनले (४०), प्रभा सिताराम मोहर्ले (५६) आणि रंजना प्रभाकर शेंडे (५०) यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या २७ मजुरांना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक प्रशासनाकडून मृतदेह गावी आणण्यासाठी आणि जखमींना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव