
* पाकिस्तानी ISI हँडलर शहजाद भट्टीशी सोशल मीडियाद्वारे संपर्काच्या संशयावरून कारवाई
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यातील विविध ठिकाणी एकाचवेळी धाडसत्र राबवले. पाकिस्तानस्थित ISI हँडलर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याच्या संशयावरून काही व्यक्तींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या हालचालींची चौकशी केली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी पाकिस्तानस्थित ISI हँडलर शहजाद भट्टीशी संबंधित दोन कथित मॉड्यूलचा पर्दाफाश करत दिल्ली आणि पंजाबमधून सहा संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसनेही या प्रकरणाशी संबंधित तपासाचा भाग म्हणून राज्यात धाडी टाकल्या.
तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद भट्टीच्या सूचनेनुसार दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. या कटासाठी सिव्हिल लाइन्समधील न्यू पोलिस लाइन्स, आनंद विहार आंतरराज्य बसस्थानक (ISBT), एका रेल्वे स्थानकासह दिल्लीतील गर्दीच्या बाजारपेठांची रेकी करण्यात आली होती. आरोपींच्या मोबाईल फोनमधून या ठिकाणांचे व्हिडिओ जप्त करण्यात आले असून, ते प्रतिबंधित मेसेजिंग अॅपद्वारे शहजाद भट्टीला पाठविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या सोशल मीडिया चॅटमधून शहजाद भट्टी हा आरोपी दानिश उर्फ चांद मियाँ याला साहित्याची डिलिव्हरी आणि साठवणुकीबाबत सूचना देत असल्याचे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास यंत्रणांच्या मते, या साहित्याचा संबंध हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल बॉम्बशी असू शकतो. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजघाटमागील विजय घाट परिसरातून पेट्रोल बॉम्ब जप्त केले होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सहाही आरोपी पाकिस्तानातील आणखी दहा व्यक्तींच्या संपर्कात होते. हे सर्वजण शहजाद भट्टीसाठी काम करत असल्याचा संशय असून, या व्यापक कटातील त्यांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दानिश उर्फ चांद मियाँ याच्यावर दिल्लीतील संभाव्य हल्ल्यांसाठी रेकी आणि नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हे ऑपरेशन यशस्वी झाल्यास त्याला २० हजार रुपयांचे मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचा साथीदार सलमान याच्यावर हल्ल्याचे चित्रीकरण करून त्याचे फुटेज शहजाद भट्टीकडे पाठविण्याची जबाबदारी होती. तर तैयब याच्यावर शस्त्रास्त्रांची खेप स्वीकारणे आणि ती विक्रीसाठी पुढे पाठविण्याचे काम सोपविण्यात आले होते.
याशिवाय, झुबैर खान याने अमृतसरहून शस्त्रास्त्रांची खेप पोहोचवल्याचा संशय आहे. अली फजल याच्यावर शस्त्रास्त्रांच्या विक्रीची जबाबदारी होती, तर मलकीत सिंह याने पाकिस्तानातून ड्रोनद्वारे टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रे नेटवर्कमधील इतर सदस्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे. या कथित आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तसेच पाकिस्तानस्थित इतर हँडलर्सच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी