
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) -
मेजर जनरल वरुण मल्होत्रा यांनी 10 जुलै 2026 रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्र मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारला. 1994 मध्ये कोर ऑफ इंजिनिअर्स (बेंगाल सॅपर्स) मध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेल्या त्यांची भारतीय सैन्यातील तीन दशकांहून अधिक काळाची गौरवशाली कारकीर्द आहे.
आपल्या सेवाकाळात मेजर जनरल मल्होत्रा यांनी विविध क्षेत्रीय तुकड्यांमध्ये कमांड, प्रशिक्षण तसेच स्टाफ नियुक्त्यांवर काम केले आहे. त्यांना मोहिमा, प्रशासकीय व्यवस्थापन, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स नियोजनाचा व्यापक अनुभव आहे. तसेच त्यांनी तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणूनही सेवा बजावली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर मेजर जनरल वरुण मल्होत्रा यांनी सर्व अधिकारी आणि सर्व पदस्थांशी संवाद साधला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे कौतुक केले आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांबाबत सतर्क राहून सर्वोच्च स्तरावरील कार्यसज्जता कायम राखण्याचे आवाहन केले.
मुख्यालय उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्र, पायाभूत सुविधांचा विकास, कार्यान्वयन सज्जता आणि संघटनात्मक उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करणे जारी राखत असताना मेजर जनरल मल्होत्रा यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा या मुख्यालयाच्या कार्याला निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी