
स्वतः पिंजऱ्यात बसून वाघिणीला केले यशस्वीपणे बेशुद्ध
नागपूर, 10 जुलै (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील उमरेड वनपरिक्षेत्रात दोन जणांचा बळी घेणाऱ्या आणि अनेक दिवसांपासून वनविभागाला हुलकावणी देणाऱ्या वाघिणीला अखेर यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे महिला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी अत्यंत धाडसाने पिंजऱ्यात बसून वाघिणीवर बेशुद्धीकरणाची गोळी अचूक झाडली. महाराष्ट्रात वाघाला बेशुद्ध करण्यासाठी नेम साधणाऱ्या त्या पहिल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी ठरल्या आहेत.
सुमारे अडीच ते तीन वर्षे वयाच्या या वाघिणीने 27 मार्च रोजी निर्मला गभणे आणि 6 जून रोजी दिगांबर पाटील यांचा शेतात काम करत असताना बळी घेतला होता. याशिवाय दोन ते तीन नागरिकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले होते. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाघिणीला पकडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलनही केले होते. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांनी वाघिणीला जेरबंद करण्यास मंजुरी दिली. बचाव पथकाची वाहने दिसताच वाघीण सावध होत असल्याने वनविभागाने रणनीतीत बदल केला. कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. वाघिणीने बांधलेल्या भक्ष्याकडे न जाता मोकाट जनावराची शिकार करून ती जंगलात ओढून नेल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर त्या परिसरात वन्यप्राण्यांच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा पिंजरा आडोशाला ठेवण्यात आला. या पिंजऱ्यात डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे बसून योग्य संधीची प्रतीक्षा करत होते. काही वेळाने वाघीण पिंजऱ्याजवळ येऊन पुन्हा भक्ष्याकडे वळली. मर्यादित दृश्यतामान आणि आव्हानात्मक परिस्थितीतही डॉ. चौरागडे यांनी अचूक नेम साधला. बेशुद्धीकरणाची गोळी लागल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत वाघीण पूर्णपणे बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला सुरक्षितपणे नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. वनविभागाच्या माहितीनुसार, वाघीण वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असून तिच्याबाबतचा पुढील निर्णय विभागाकडून घेण्यात येणार आहे. प्रादेशिक वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास आणि सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनखात्याच्या पथकानेही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी